देसाईगंज तालुका भाजपा कार्यकर्ता बैठक संपन्न

138

The गडविश्व
देसाईगंज : तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने २८ मार्च २०२२ रोजी कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.यात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी ४ एप्रिल २०२२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार असल्याने पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन दरम्यान करण्यात आले आहे.
मोर्चाचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार असुन यावेळी माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार,माजी ऊर्जा मंत्री आ.चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील या संबंधाने तालुक्यात कार्यकर्ता बैठक घेण्यात आली आहे.
बैठकिला जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे आमदार कृष्णा गजबे,रेखा दोडश, आशा नाकाडे,शालू दंडवते, रोशनी पारधी, रेवता अणोले, रमकांत ठेंगरी, राजेश जेठानी, सुनिल पारधी आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून जास्तीत जास्त “आक्रोश” मोर्चाला शेतकरी उपस्थित राहतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.दरम्यान जिल्हाध्यक्षांनी बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला.या बैठकीला तालुक्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या कामाची विस्तृत माहिती देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून राज्यात सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार ही केवळ घोषणा देणारे असुन आश्वासनाची पूर्तता करणारे नाही. विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करतात मात्र मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे धानपीक धोक्यात आले. उत्पादन खर्च निघू शकला नाही अशी परिस्थिती सर्वत्र असतानाही या शासनाने धान खरेदी केंद्र अनियमितपणे सुरू केले.
अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहिले असुन बोनसची घोषणा करूनही या सरकारने बोनसच नव्हे तर खरेदी केलेल्या धानाचे चूकारेही शेतकऱ्यांना दिले नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.धान खरेदी केंद्रावर उशिरा धान खरेदी सुरू करणे,धानाचे चुकारे प्रलंबित ठेवणे तसेच धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस,शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज कापली जात आहे. २४ तास विजेची आवश्यकता असताना केवळ ८ तास नाम मात्र वीज देऊन वारंवार खंडित केली जात आहे व राज्यात गुंडशाही दडपशाही महिलांवर अत्याचार सुरू आहेत मात्र त्याकडे शासन गंभीर नसल्याने एकसंघ लढा देण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
तथापी राज्यातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असुन त्यातील काही मंत्री जेलमध्ये आहेत. काही मंत्र्यांवर दहशतवाद्यांना पैसे दिल्याची गंभीर आरोप आहे परंतु त्यांचे राज्यशासन निर्लज्जपणे समर्थन करीत आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेच्या मनातील हा महा जनआक्रोश असून या मोर्चाच्या निमित्ताने सरकारच्या कानापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार प्रति आक्रोश व्यक्त करावा. त्याकरिता आपण आपल्या गावातील महिला, मजूर, कामगार, शेतकरी, तरुण या सर्वांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन आमदार गजबे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here