१३ एप्रिल पासून सिरोंचा येथे पुष्कर कुंभमेळा : लाखो भाविक राहणार उपस्थित

753

– दर बारा वर्षानंतर भरतो पुष्कर कुंभमेळा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर दर १२ वर्षांनी येणारा पुष्कर मेळावा १३ एप्रिलपासून २४ एप्रिल पर्यंत भरणार आहे. पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील नदी घाटावर तेलंगणा, छत्तीसगड सह महाराष्ट्रातील लाखो भाविक स्नान करण्यासाठी व कालेश्वरम येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. १२ वर्षानंतर भरणाऱ्या पुष्कर मेळाव्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू असून कोणत्याही अडचणी भाविकांना येऊ नये म्हणून गतीने कामे केली जात आहेत. यावेळी विविध आवश्यक कामे करून जिल्हा प्रशासन येणाऱ्या भाविकांचे जिल्ह्यात स्वागत करीत आहे.
मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी तीन महीने अधीपासूनच भाविकांसाठी नदीघाटावरील जागा तयार करणे, स्वच्छतागृह तयार करणे, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी लागणारी मदत याबाबत तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या होत्या. तसेच तेलंगणा प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले, मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधून भाविकांचा येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करणे याबाबतही नियोजन केले गेले. यापुर्वी सन २०१० साली झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सिरोंचा येथे पुल नव्हता. आता येण्याजाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याकारणाने सिरोंचाकडे जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. साधारण ५ लाख भाविकांच्या हिशोबाने सदर मेळाव्याचे आयोजन होवू शकते असा अंदाज व्यवस्थेसाठी गृहित धरण्यात आला आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्कर मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्यामूळे आवश्यक सुविधा निर्मितीसाठी त्या निधीची मदत झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील स्थानिक प्रशासनाबरोबर तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर तयारीबाबत वेळोवेळी चर्चा केली बैठका घेतल्या. जिल्ह्यात ‘क’ वर्ग पर्यटन यादीत ६ ठिकाणांचा समावेश १८ जानेवारी २०२२ रोजी करण्याच्या ठराव संमत करण्यात आला. यात पुष्कर महामेळा ज्या ठिकाणी भरतो तेथील प्राणहिता नदीवरील सिरोंचा घाट, नगरम घाट व टेकाडा घाट यांचा समावेश करण्यात आला आहे. यामूळे संबंधित ठिकाणी भविष्यात पर्यटन विषयक कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्याबाहेरील लोकांसाठी पर्यटन म्हणूनही गडचिरोली जिल्हा चांगला आहे. त्यामूळे पर्यटन क्षेत्रामध्ये असणाऱ्या स्थानिकांना त्याचा सरळ अर्थिक फायदा होईल. या २०२२ च्या पुष्करसाठी जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या पुढाकाराने १० कोटी रूपयांची विविध कामे पुष्करसाठी मंजूर करून ती वेळेत पुर्ण करण्यात येत आहेत. याबाबत तेलंगणा राज्यातील विविध माध्यमांनीही सकारात्मक बातम्या देवून कामाचे कौतूक केले.

भाविकांसाठी विविध सोयीसुविधांची निर्मिती : सिरोंचा शहरालगत दोन ठिकाणी प्राणहिता नदीवर स्नान करण्यासाठी नदी घाट आहेत. एक विठ्ठलेश्वर मंदिराजवळ तर दुसरा नगरम जवळ. या दोन्ही ठिकाणी पुष्कर दरम्यान येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. यात विठ्ठलेश्वर मंदिराजवळील घाट, नगरम, पोलीस चौकी, कंट्रोल रूम तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सनियंत्रणासाठी बसविण्यात येत आहेत. पुष्कर बाबत सनियंत्रणासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसाठी पेंडाल व टेंट उभारण्यात येणार आहेत. तसेच सर्वच ठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्यात येणार आहेत. विविध सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकर व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपत्ती विभागाकडून स्नानावेळी बचाव पथके उभी केली जाणार आहेत. पोहणारे व प्रशिक्षित मनुष्यबळ अनुचित प्रकारांवर आळा घालणार आहे. यावेळी विविध आपत्ती व्यवस्थापन वाहने तसेच इलेक्ट्रीक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वागत कक्षाची उभारणी केली जात आहे. दोन्ही ठिकाणी शुद्ध पाणी व्यवस्था तसेच हातपंप, विंधन विहीरीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. विविध गर्दीच्या ठिकाणी एलएडी स्क्रीनवरती आवश्यक माहिती सतत भविकांना दिली जाणार आहे. शौचालय व्यवस्थेसह आंघोळीसाठी स्नानगृह तसेच कपडे बदलण्यासाठी रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. नदी घाटावर जाणारा रस्ता सीमेंटचा तयार करण्यात आला आहे. ६० नग रस्त्यांवरील लाईट्ससह ५ हायमास्ट लाईट उभारण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या व आरोग्य सुविधांच्या कामासाठी २० टेंट लावण्यात येत आहेत.
कोविडबाबत विविध मेडिकल साहित्यासह आवश्यक इतर उष्णतेबाबत औषध पुरवठा करण्यात आला आहे. स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ, कचरागाडीसह व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर पुष्करबाबत प्रशासनाकडून प्रचार प्रसिद्धी करून पुष्करबाबत माहिती दिली जाणार आहे. पुष्करबाबत माहितीपटाची निर्मिती, बॅनर, होर्डीग्ज, वृत्तपत्र जाहीरात तसेच गडचिरोली लाईव्ह ॲपसह विविध सोशल मिडीयावरून माहिती दिली जाणार आहे.

भारतातील १२ पुष्कर ठिकाणे : पुष्कर हा नद्यांच्या पूजेला समर्पित असा भारतीय सण आहे. याला पुष्करलू (तेलुगुमध्ये), पुष्करा (कन्नडमध्ये) किंवा पुष्कर (मराठी व हिंदी मध्ये) म्हणतात. हा भारतातील १२ प्रमुख पवित्र नद्यांच्या काठावर असलेल्या देवस्थानांमध्ये पूर्वजांची पूजा, आध्यात्मिक प्रवचन, भक्ती संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. प्रत्येक नदीकाठी १२ वर्षांतून एकदा हा उत्सव दरवर्षी होतो. प्रत्येक नदी एका राशीच्या चिन्हाशी संबंधित आहे आणि प्रत्येक वर्षाच्या उत्सवाची नदी त्या वेळी कोणत्या राशीत बृहस्पति आहे यावर आधारित आहे. प्रादेशिक भिन्नतेमुळे, काही राशिचक्र अनेक नद्यांशी संबंधित आहेत. जातक पारिजात (१४२६) सारख्या ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेल्या आख्यायिकेनुसार, कठोर तपश्चर्येनंतर एका पुजाऱ्याला शिवाकडून वरदान मिळाले. वरदान म्हणजे तो पाण्यात राहून पवित्र नद्या शुद्ध करू शकेल. तो पुढे पुष्करा (“जो पोषण करतो”) म्हणून ओळखला जाऊ लागला. बृहस्पतीच्या विनंतीवरून, जेव्हा बृहस्पती एका राशीतून दुसऱ्या राशीत गेला तेव्हा त्याने १२ पवित्र नद्यांपैकी एकात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नदी एका राशीशी निगडीत असते आणि प्रत्येक वर्षाच्या सणाची नदी त्या वेळी गुरु (ब्रहस्पती) ग्रह कोणत्या राशीत आहे यावर आधारित असते. असे काही कालखंड असतात जेव्हा गुरु प्रतिगामी गतीमध्ये असतो, परिणामी वर्षातून दोनदा एकाच राशीत प्रवेश होतो. अशा प्रसंगी, बृहस्पतिचा दुसरा प्रवेश उत्सवाचा पहिला भाग साजरा करण्यासाठी गणला जातो.
प्राणहिता पुष्कर हा प्राणहिता नदीचा उत्सव आहे जो साधारणपणे १२ वर्षातून एकदा येतो. बृहस्पति मीन राशीत प्रवेश केल्यापासून १२ दिवसांच्या कालावधीसाठी पुष्कर पाळला जातो (मीना राशी). १२ नद्यांवर यामध्ये गंगा(गंगोत्री, हरीद्वार, वाराणसी सह सहासात नदीघाटा वर), नर्मदा (ओमकारेश्वर), सरस्वती(प्रयाग), यमुना(मथुरा), गोदावरी (कोटीलींगला, कालेश्वरम), क्रिष्णा (विजयवाडासह दक्षिण भागात), कावेरी(कर्नाटक), भीमा(कर्नाटक व तेलंगणा), तप्ती( ब्रह्मपुत्रा नदी आसाम), तुंगभद्रा(तेलंगणा व आन्ध्र प्रदेश), सिंधू (लद्दाख व लेह) व प्राणहिता (सिरोंचा महाराष्ट्र)नद्यांवर दरवर्षी एका ठिकाणी पुष्कर भरत असतो. एका ठिकाणी पुष्कर झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा १२ वर्षानंतरच पुढिल पुष्करचे आयोजन होत असते.

कसे याल : सिरोंचा हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याचे तालुका ठिकाण आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर कालेश्वरम मंदिराजवळ गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या संगमाजवळ शहर वसलेलं आहे. सिरोंचा येथे येण्यासाठी नागपूर हुन गडचिरोली मार्गे अथवा चंद्रपूर मार्गे जाण्याचा रस्ता आहे. नागपूरहुन गडचिरोली १७१ किलोमीटर आहे तर चंद्रपूर १५३ किलोमीटर आहे. सिरोंचा हे ठिकाण गडचिरोली पासून २०५ किलोमीटर वर आहे तर चंद्रपूर हुन गोंडपिंपरी मार्गे २०९ किलोमीटर आहे. सिरोंचा साठी जवळचे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील चंद्रपूर व नागपूर हे आहे. प्रवासासाठी जवळचे विमानतळ नागपूर आहे. तसेच सिरोंचाहुन हैद्राबाद सुद्धा २७३ एवढ्या किलोमीटरवर आहे.

पुष्कर आणि गडचिरोली पर्यटन : गडचिरोली जिल्हा वनसंपदेने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्ह्यात पाहण्यासारखी ८० हून अधिक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पुष्कर साठी तुम्ही येण्याचा विचार करत असाल तर गडचिरोली जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा आस्वाद घेऊ शकता. यामध्ये प्रामुख्याने आष्टी येथील शेकरू पार्क, आलापल्ली अहेरी येथील वनवैभव आलापल्ली, त्याठिकाणी जवळच असलेले कमलापूर हत्ती कॅम्प, सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा धबधबा, पुष्कर जवळ असलेले डायनासोर फॉसिल पार्क, सिरोंचा येथून जवळ असलेला सोमनुर त्रिवेणी संगम तसेच तीन राज्यांची सीमा असलेले मध्यवर्ती ठिकाण, सिरोंचा शहरातील दीडशे वर्ष जुने शासकीय विश्रामगृह याव्यतिरिक्त अहेरीहून भामरागड तसेच हेमलकसा हे प्रकाश आमटे यांचं ठिकाणही पाहू शकता. जाताना वाटेत चपराळा अभयारण्य लागते.

वातावरण – सिरोंचा हे ठिकाण उन्हाळ्यात काही प्रमाणात उष्ण असते. यावेळी पुष्कर कुंभमेळ्यादरम्यान १३ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान सर्वसाधारण ४० अंश डिग्री सेल्सियस ते ४४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक साहित्य येताना सोबत असणे भाविकांसाठी गरजेचे आहे.

– सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here