पुष्कर यात्रा होणार दारू व तंबाखूमुक्त

634

– तालुका समितीच्या बैठकीत चर्चा
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीवर येत्या १३ ते २४ एप्रिल यादरम्यान भरणारी पुष्कर यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासन, मुक्तिपथ अभियान संयुक्तरित्या प्रयत्न करणार आहे. अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर पथकाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी ७ एप्रिल रोजी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीची बैठक पार पडली.
यावेळी मुक्तिपथ तालुका समितीचे सदस्य संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे, नायब तहसीलदार एच.एस.सय्यद , पी.आर.पप्पूलवार, मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, पोलिस उपनिरीक्षक शीतल धविले, तालुका संघटक सुनीता भगत, गट शिक्षणाधिकारी डी.वाय.कांबळे, उमेदचे महेश नीलम, भगवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एच.शेंडे, आरोग्य विभागाचे डॉ. कलोडे, तालुका प्रेरक शंकर गग्गूरी उपस्थित होते.
पुष्कर यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी दारू, तंबाखूमुक्त जत्रा, कायदा माहितीचे बॅनर ठिकठिकाणे लावले जातील. भगवंतराव व सीव्ही रमण या महाविद्यालयातील स्वयंसेवकांचे प्रत्येकी १० विद्यार्थ्यांचे तीन पथक तयार करण्यात येतील व त्यांना मुक्तिपथ तर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जत्रा परिसरात पोलिस विभागाचे स्वतंत्र फिरते पथक राहील. या पथकाच्या माध्यमातून अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. जत्रा परिसरात खर्रा व तंबाखू पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र न देणे. याशिवाय मुक्तिपथ टीम स्वतंत्र निरीक्षण करणार आहे.
दरम्यान ग्रापं समित्या किती स्थापन करण्यात आल्या, काय अडचणी आहेत व उपाय याबाबत बीडीओ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. शहर व गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी पोलिस विभागाद्वारे काय कारवाई झाली याबाबत चर्चा झाली. पुष्कर यात्रा बघता नगरम येथील दारूविक्रेत्यांवर त्वरित कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सुगंधित तंबाखू, खर्रा विक्रेत्यांवर पोलिस विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. येटाकोटा जंगलपरिसरातील दारू अड्डे उध्वस्त करणे, व्यसनउपचार क्लिनिक घेणे आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here