– मुलीची विक्री करून घेतले साहित्य
The गडविश्व
नागपूर : पोटच्या २ महिन्याच्या मुलीचा बापाने सौदा करून विक्री केल्याचा संतापजनक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. बापाने दोन महिन्यांच्या चिमुरडीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक माहिती सामोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी पित्यासह विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. उत्कर्ष दहिवले असे अटक करण्यात आलेल्या वडिलाचे नाव असून उषा सहारे असे मध्यस्थी करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे.
आरोपी उषा ही रामटेक मधील खाजगी अनाथआश्रमामध्ये काम करते. तर उत्कर्ष नळ फिटिंगचे काम करतो. बापाने पोटच्या २ महिन्याच्या मुलीला १ लाखात विकले. त्यानंतर हा निर्दयी बाप एवढ्यावर थांबला नाही तर त्याने मुलीला विकल्याची वाच्छता केल्यास पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर चिमुकलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीची विक्री केल्यानंतर उत्कर्षला सत्तर हजार रुपये मिळाले होते तर उषा नावाच्या मध्यस्थी करणाऱ्या आरोपी महिला 30 हजार रुपये मिळाले होते. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करत दोघांना अटक केल्यानंतर आरोपी बापानं मुलीची विक्री करून दुचाकी, म्युझिक सिस्टीम आणि दिवाण अशा ऐशोआरामच्या वस्तू खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा समावेश आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.