– गावकऱ्यांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला येथील ग्रामपंचायत, गाव संघटना, पोलीस पाटील, गावकरी व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कृती करीत दोन विक्रेत्यांकडून जवळपास १२ हजारांची देशी व मोहफुलाची दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दोघांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोर्ला येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करून मुक्तिपथ ग्रापं समिती पुनर्गठित करण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात गावातील विक्रेत्यांना पूर्व सूचना देण्यात आली होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी समितीच्या सूचनेला न जुमानता विक्री सुरूच ठेवली होती. गावातील दोन घरी अवैध दारूविक्री सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्रापं पदाधिकारी, गावकरी व गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांच्या घरी पाहणी करून जवळपास १२ हजारांची अवैध दारू जप्त केली. यामध्ये दादाजी मेश्राम याच्याकडे तीन हजार रुपये किंमतीची मोहफुलाची दारू व विजय भोयर याच्याकडील ९ हजार ७२० रुपयांच्या १६२ देशी टिल्लू या मालाचा समावेश आहे.
दरम्यान, यासंदर्भातील माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली. यावेळी पोर्ला गावचे सरपंच निवृता राऊत, भ्रविजआ समितीचे गडचिरोली तालुका अध्यक्ष रवींद्र सेलोटे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी राऊत, माजी सैनिक राकेश निशाणे, पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, मुक्तीपथचे तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, गाव समितीचे सदस्य सौरभ चापले, अशोक चापले, मनोज किरमिरे, भूषण चापले, निखिल रोहणकर, कृष्णा भोयर व गावातील नागरिक उपस्थित होते.