– राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त जिल्ह्यात २५ एप्रिल ते ०२ मे दरम्यान विशेष मोहिम
– १ ते १९ वयोगाटातील एकुण पात्र लाभार्थी २ लाख ८८ हजार
The गडविश्व
गडचिरोली : मुलांना परजीवी जंतापासून आजार उद्भवणाचा धोका जास्त असतो. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यांवर सूज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंतनाशक गोळ्या पात्र वयोगटातील सर्व मुलांना देवून मोहिम यशस्वी करा अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या. या मोहिमेबाबत नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच महिला व बाल विकास अधिकारी, तसेच मोहिमेत सहभागी इतर अधिकारीही उपस्थित होते.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम २५ एप्रिल ते ०२ मे या कालावधीत जिल्ह्यात वर्षातील पहिली राष्ट्रीय जंतनाशक मोहिम म्हणून आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील २८८६२५ मुले आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. एकुण पात्र लाभार्थी २८८६२५ यामध्ये १ ते ६ वयोगटातील अंगणवाडीतील बालके ८३०४७ , तसेच ६ ते १० वर्ष वयोगटातील बालके ६२७५८ तसेच १० ते १९ वर्ष वयोगटातील बालके १४२८२० आहेत.
या मोहिमेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यामधे नोडल शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका मिळून ५९६९ सहभागी होणार आहेत. यामध्ये अंगणवाडी व मिनी अंगणवाडी २३७६ , शासकीय अनुदानित शाळा १७३५, खाजगी शाळा ३४३, तांत्रिक संस्था ५२ असे एकूण नोडल शिक्षक २१३०, आशा-१४६३ आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण बुथची संख्या ही अंगणवाडी केंद्र व शाळा मिळूण ४५०६ असून यामध्ये अंगणवाडी व मिनी अंग.-२३७६ व शाळा २१३० आहेत. तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या उपलब्ध गोळयांची संख्या ही ३०३०५६ आहे. औषधाची मात्रा ही पुढीलप्रमाणे असून औषधाचे नाव अल्बेन्डाझोल ४०० mg असे आहे व ०१ ते ०२ वर्ष वयोगटातील बालकांना औषधीची मात्रा ही अर्धी गोळी (अल्बेंडाझोल २०० मि.ग्रॅ.) पावडर करुन व पाण्यात विरघळून पाजावी. ०२ ते ०३ वर्ष वयोगटातील बालकांना एक गोळी (४०० मि.ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून पाजावी.). ०३ ते १९ वर्ष वयोगटातील यांना एक गोळी ४०० मि.ग्रॅ. चावून खाण्यास लावणे. एक वर्षा पेक्षा कमी वयाच्या बालकांना गोळी दिली जाणार नाही.
जंताचा प्रादुर्भावच होणार नाही याकरीता याप्रमाणे दक्षता घ्यावी : जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, भाजी व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे, स्वच्छ व उकडलेले पाणी प्यावे, पायात चपला व बुट घालावे, नियमित नखे कापावी, शौचालयाचाच वापर करावा, उघडयावर शौचास बसू नये, परिसर स्वच्छ ठेवावा.
“सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे व पोषण स्थिती उंचावणे हा हेतू आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा मधील मुलां-मुलींकरीता जंतनाशक गोळया अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत खावू घालणार आहेत. तरी याचा लाभ घेण्यात यावा व या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे”
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गडचिरोली डॉ.दावल साळवे यांनी केले आहे.