विविध गावातील विक्रेत्यांकडील दारू नष्ट

304

– गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भोगनबोडी, कर्कापल्ली व नवनीत ग्राम येथील दारूविक्रेत्यांविरोधात गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत जवळपास ४६ हजारांची मोहफुलाची, देशी दारू व साहित्य नष्ट केले आहे.
भोगनबोडी, कर्कापल्ली व नवनीत ग्राम येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे मद्यपींच्या संख्येत वाढ होत होती. महिलांना त्रास सहन करावा लागत होता. या दारूविक्रेत्यांना गाव संघटनेच्या माध्यमातून वारंवार सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे गाव संघटनेच्या पुढाकारातून अहिंसक कृती करण्याचे नियोजन करण्यात आले . त्यानुसार मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिन्ही गावातील विक्रेत्यांकडील दारू पकडून नष्ट केली.
कर्कापली गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने भोगनबोडी शेतशिवारात शोधमोहीम राबवून १० हजारांचा मोहसडवा व ५ हजार रुपये किंमतीची दारू नष्ट करण्यात आली. कर्कापल्ली येथील दारूविक्रेत्यांच्या सहा घरांची पाहणी केली असता, तीन ठिकाणी २० हजार रुपये किंमतीची देशी दारू मिळून आली. तसेच नवनीत ग्राम गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने नवनीत ग्राम येथील चार घरांची तपासणी केली असता ११ हजार रुपये किंमतीची मोहफुलाची व देशी दारू मिळून आली. तिन्ही गावातील विक्रेत्यांकडील जवळपास ४६ हजारांची देशी व मोहाची दारू नष्ट करीत अवैध व्यवसाय बंद न केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी गाव संघटनेच्या महिलांसह मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here