घोडे सरकारचे मारले नाय : गडचिरोलीत विमान हवाय !

339

(मागास भागातील जनतेचा आकांत)

अविकसित स्थानांचा विकास हा तेथील उपलब्ध दळणवळणाच्या साधनाने होत असतो. या साधनांमुळे लोकांचे आवागमन जोर धरू लागते. बाह्य जगाचा परिणाम हा तेथील जनजीवन बदलून टाकतो. रहनसहन, राहणीमान, बोलचाल, देवाणघेवाण आदींमध्ये यथोचित फरक पडतो. असा बदल गडचिरोली जिल्ह्यातील जनतेत खुप संथ गतीने होत आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे बघता बघता सरली. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा मागासलेपणा इतर जिल्ह्याच्या तुलनेत शिखरावरच आहे. आजवर बऱ्याच गावात विद्युत, पक्के रस्ते, एसटी बस आदी सोयी पोहोचल्याच नाहीत, ही शोकांतिका आहे. मागील पाच वर्षांपूर्वी रेलवे होणार व त्यावर ट्रेन धडधडत धावणार म्हणून जनतेत नुसतीच हवा भरली गेली. आता मात्र त्यावर कोणीही जोर देऊन बोलताना आढळत नाही. जनतेत आशेची हवा भरून तिला तट्ट फुगविल्या गेले. आता ती आपोआप कमी होऊन फुग्याचा केवळ “गुलगूला रे गुलगूला !” झाला आहे. काय म्हणावे याला ? जिल्ह्याचे हे दुर्दैवच !
हिरव्या सोन्याचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर ज्याची ओळख आहे, त्या गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे शून्यातच जमा आहेत. त्यामुळे येथील बहुसंख्य बेरोजगार जनता कंद, मूळे, फळे, पाने खाऊन कसेबसे चरितार्थ भागविते. दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे रोजगाराच्या शोधात भटकणेही जिकरीचे काम आहे. तालुक्याला पायी पायी डोंगर, दऱ्या, खोऱ्यांना तुडवत ओलांडत जावे लागते. म्हणून उच्चशिक्षित तरुणाईने रोजगाराची आस सोडली आहे. ती तर सद्या शेळ्या, गुरेढोरे, डुकरे आदींची राखण करणे आणि वनोपज गोळा करणे, यातच धन्यता मानत आहे. शेतीच्या बलबुत्त्यावर धंद्यासाठी भांडवल उभारू शकत नाही. कारण शेतजमीनही फारशी नाही. वनविभाग प्रशासन नवीन शेतजमीनही त्यास उठवू देत नाही. रेलवेचे बांधकाम व ट्रेनची झुकझूक लवकरच सुरू होऊन कामधंदा मिळेल, याच मनोहारी स्वप्नात बेरोजगार वर्ग अजूनही हरवलाच आहे. मात्र ते स्वप्नही आता धूसर झालेले दिसते. मग, सांगा साहेब, जिल्हाचे मागासलेपण दूर होईलच कसे? म्हणून आता मोठ्यात मोठे दिवास्वप्न उरात बाळगले जात आहे, ते म्हणजे विमान ! जिल्हावासियांचे मनच विमान बनून ते या नवकल्पनेच्या दुनियेत घिरट्या घालू लागले आहे.
जिल्ह्यातील एका नागरिकाने माझ्या या वक्तव्यावर हसत हसत म्हटले- भौसाब, काय पण बोलताजी ? विमान कसा गडचिरोलीत उतरंलजी ? त्यास मी म्हणालो- भौ, हसण्यावारी नेऊ नका ! विमान मागणीनं शासनास का देऊ नाही धक्का ? महाराष्ट्र राज्यातील मुंबईसारख्या मोठाल्या शहरात दळणवळणाची नानातऱ्हेची असंख्य साधने उपलब्ध असूनही मेट्रो ट्रेनची गरजच का गा ? तेथे माणसे आहेत आणि येथे काय फक्त जनावरे आहेत का हो ? आमचा गडचिरोली जिल्हा तर राज्याची राजधानी- मुंबईपासून शेकडो कोस दूर आहे. पूर्वेच्या या टोकावर आमचा जिल्हा तर पश्चिमेला त्या टोकावर मुंबई आहे, हे सर्वांना माहित आहे ना ! की नाही ? फक्त जिल्ह्याच्या एका किनाऱ्यावर देसाईगंज येथे ब्रिटिश कालीन छोटे रेल्वे स्टेशन आहे. मात्र गेल्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मागास क्षेत्रात विकासासाठी काय दिवे लावले? येथे मेट्रो ट्रेन सेवा सुरू केली का ? नाही. मग विमान सेवा सुरू करा म्हटले तर बिघडले कुठे? आम्ही साधी कार गावात येताना बघितली नाही. लहान मुलांना प्लास्टिकच्या कार, ट्रॅक्टर, ट्रक, बस, ट्रेन, हेलिकॉप्टर, विमान आदी खेळण्या खरेदी करून देतो, तेव्हाच सर्वांना ती साधने-वाहने अशी असतात म्हणून कळते. किती कमनशिबी आहोत आम्ही! नाही का ? ही साधने इकडे राज्यशासन सुरू करून देत नाही. मग आम्ही सरकारचे घोडे मारले का हो ?
विदर्भ राज्य निर्माण संघटनेच्या विदर्भवादी बांधवांच्या वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरू लागली आहे. ती कशासाठी ? याचा विचार शासनाच्या धुरिणांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील वाढता नक्षलवाद व वाढती सैन्यभरती ही बेरोजगारीचे मूळ आहे. भुकेची तीव्रता, गरीबीची जळजळ, आर्थिक चणचण यासाठीच येथील बेरोजगार तरुणाई वेसनाधीन, नक्षलीत भरती आणि नक्षलवादाचा बिमोड करणाऱ्या सैन्यदलात भरती होत आहे. येथीलच तरुण- आपल्याच नातलगावर नक्षली व सैनिक बनून त्वेषाने तुटून पडत आहे, एकमेकांवर आदळून आपटून जीवानीशी मरत आहे. याला कोण जबाबदार ? सरकारच नाही का ? जिल्ह्यातील अतोनात वनसंपदेवर शासन मजा मारतो. त्याचा भरमसाठ फायदा उठवितो. इकडे खरोखरचे वृक्षारोपण जनतेमार्फत केले जाते, तर तिकडे विकसीत भागात फक्त वृक्षारोपणाचे नाटक केले जाते आणि वनांच्या जागेत शेतजमीनी काढल्या जातात. इकडे मात्र वंशपरंपरागत शेतीच्या दोनच बांध्यांत- अर्ध्याएक एकरात काय सोने पिकतेय का ? मग उद्योगधंद्याशिवाय, रोजगाराशिवाय येथील माणूस जगावा की मरावा ? दळणवळणाची साधने आली तर या सर्व समस्या आपोआप मिटतीलच, अशी अपेक्षा आहे.

– लेखक –
श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे.
(मराठी-हिंदी साहित्यिक विदर्भ प्रदेश)
मु. रामनगर, गडचिरोली.
जि. गडचिरोली, फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here