The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी व चामोर्शी येथील अवैध तंबाखू विक्रेत्यावर, अन्न व औषध विभागाच्या सहाय्याने पथक निर्माण करून पोलीस विभाग कडक कारवाई करेल असे एसडीपिओ प्रणील गिल्डा हे गडचिरोली येथे झालेल्या बैठकीत म्हणाले.
गडचिरोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आज दिनांक १ जून २०२२ रोजी मुक्तिपथ व पोलिस विभागाची झोनल संयुक्त बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक, अरविंद कतलाम, गडचिरोलीचे तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, चामोर्शी तालुका संघटक आनंद इंगळे, आरमोरी तालुका संघटिका भारती उपाध्ये, इत्यादी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत तिन्ही तालुक्यातील शहर व मोठ्या गावाच्या पातळीला अवैध दारू व तंबाखू विक्री स्थिती बाबत मुक्तिपथ तालुका टीमने मांडणी केली. यावेळी विविध मुद्यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले जसे दारूच्या मोठ्या विक्रेत्यावर ९३ चा बाँड करून रक्कम आकारणे व पुन्हा गुन्हा केल्यास पुढील शिक्षा देणे, तडीपारी करिता वरिष्ठ पातळीला पाठपुरावा घेणे, ज्या मोठ्या गावाने दारूविक्री बंद केली अशा गावात लाभार्थी असल्यास दादालोरा खिडकी योजने अंतर्गत लाभ देणे, दारूबंद झालेल्या मोठ्या गावात, गावाला प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस जनजागरण मेळावे घेणे, चामोर्शी तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारू येऊ नये म्हणून निवडक ठिकाणी चेक पोस्ट लावणे, दारूविक्रेत्यावर गुन्हे नोंद होऊन कोर्टातून शिक्षा व्हावी यासाठी पंच निवडून त्यांना प्रशिक्षण देणे, दर महिन्याला पोलीस पाटलांच्या होणाऱ्या बैठकीत प्रशिक्षण देणे, उत्पादन शुल्क विभाग यांच्या द्वारे कारवाई करणे, होलसेल व चिल्लर तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध विभाग आणि संबधित पथकांची मदत घेऊन १५ दिवसातून एक राउंड घेणे व कारवाई करणे. तालुक्यातील उपविभागीय महसूल अधिकारी यांना भेटून ९३ च्या प्रस्तावानुसार कारवाई करण्यास कोणती अडचण येत आहे यासंदर्भात चर्चा करणे व त्या प्रक्रियेला गती आणणे. इत्यादी मुद्द्यावर अवैध दारू व तंबाखू नियंत्रणासाठी अडचणी व उपायाबाबत चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले.