२ लाख ८० हजारांचा गुळाचा सडवा नष्ट

252

– दोघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील चिंतरेवला येथे हातभट्टी सुरु असल्याची माहिती मिळताच असरअल्ली पोलिस मुक्तिपथ व गावसंघटनेने संयुक्तरीत्या धाड टाकून २ लाख ८० हजार रुपये किंमतीचा १८ ड्रम गुळाचा सडवा व ४५ लिटर दारू नष्ट केल्याची कारवाई गुरुवारी केली. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चिंतरेवला (जोडेपल्ली) येथे गाव संघटनेच्या पुढाकारातून अवैध दारू विक्रीचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते. दरम्यान, गावातील सहा दारूविक्रेत्यानी आपला अवैध व्यवसाय सुरु केला होता. या गावातून असरअल्ली, अंकिसा, राघवनगर, बालमुत्यपल्ली, लक्ष्मीदेवपेठा येथील किरकोळ विक्रेत्यांना अवैध दारूचा पुरवठा केला जात होता. गावातील दोन विक्रेत्यांनी घरीच हातभट्टी लावून दारू गाळल्या जात असल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार असरअल्ली पोलिस, मुक्तिपथ व गावसंघटनेने संयुक्तरित्या धाड टाकून दोन घरांची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा आढळून आला.
जंपया दुर्गम याच्याकडे १४ ड्रम गुळाचा सडवा व ३० लिटर दारू व श्रीकांत जाळी याच्या घरात ४ ड्रम सडवा व १५ लिटर दारू असा एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ ड्रम मोहफुलाचा सडवा व ४५ लिटर दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत दोघांवरही असरअल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते. या कारवाईमुळे परिसरातील दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here