फुलोरा – शिक्षणातील नवप्रवाह

819

महाराष्ट्र राज्याच्या अगदी पूर्वेला जंगलाने व्याप्त, सुरजागड, वैरागड,टिपागड सिरकुंडा डोंगरदर्‍यांनी नटलेला, वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी इंद्रावती परलाकोटा पामुल गौतम अशा प्रमुख नद्यांनी सजलेल्या आणि आपल्या धरणीत अनंत मौल्यवान रत्ने दडलेल्या, आदिवासी गोंड माडिया अशा मूलनिवासी जनतेचे वैभव असलेल्या गडचिरोली जिल्हा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली अतिशय मागास, आदिवासी व अप्रगत जिल्हा म्हणून संबोधले जाते. इथली अ वर्गाच्या सागवानी लाकडे जगप्रसिद्ध असुन विदर्भाची काशी मार्कंडा, ग्लोरि आफ अल्लापल्ली, लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा, वैरागड, सर्च शोधग्राम अशी महत्त्वाची ऐतिहासिक पौराणिक तसेच मौलिक पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्याची स्थापना 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन झाली. या जिल्ह्याच्या सीमेला उत्तरेस भंडारा जिल्हा, पूर्वेस मध्य प्रदेशातील राजनांदगाव व बस्तर जिल्हा, दक्षिणेस आंध्र प्रदेशातील करीमनगर व आदिलाबाद जिल्हा, व पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे. जिल्ह्याचे 14 हजार 412 चौरस किलोमीटर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 4.7 टक्के आहे. गडचिरोली जिल्हा वनांनी व्यापलेला आहे. या जिल्ह्यात बारा तालुके आहेत. गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालय असून जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार सहा शहरे व 1675 खेडी असून त्यापैकी 1509 खेडी लोकवस्ती असलेली व 166 ओसाड आहेत. 12 पंचायत समित्या या जिल्ह्यात कार्यरत असून उपरोक्त बाराही पुनर्रचित तहसीलच्या ठिकाणी त्यांचे मुख्यालय आहे. या जिल्ह्यात वडसा देसाईगंज येथे नगरपरिषद पूर्वीपासून अस्तित्वात आहेत परंतु 26 ऑगस्ट 1982 पासून नवीन गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यानंतर गडचिरोली येथे जून 1985 पासून नगरपरिषद स्थापन करण्यात आली. जनगणना 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दहा लाख 72 हजार 942 इतकी असून पाच लाख 41 हजार 328 पुरुष व पाच लाख 31 हजार 614 स्त्री आहेत. एकंदरीत आतापर्यंत आपण गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघितली.
या जिल्ह्याला आपण नेहमीच शिक्षणामध्ये मागासलेला जिल्हा संबोधित असतो. शाळा आणि महाविद्यालयांची स्थिती काय आहे ते आता आपण बघू. या आदिवासी भागात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये 2013- 14 यावर्षी 1636 प्राथमिक शाळा असून त्यात एकूण 4290 शिक्षक कार्यरत आहेत तर शाळेत 92 हजार 830 विद्यार्थी शिक्षण घेत होते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या 329 असून त्यामध्ये एकूण 3952 शिक्षक कार्यरत आहे
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत संपूर्ण बाराही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालवल्या जातात. यापैकी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळात 2020 नंतर covid-19 या महामारी चा प्रादुर्भाव असतांना संपूर्ण जिल्हाभर शिक्षणाची बिकट अवस्था निर्माण झालेली होती. शिक्षणाची दारे बंद असताना विद्यार्थी शाळेपासून दूर राहू लागले. यातच विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू लागला. अशातच 2020 आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांनी सूत्रे सांभाळली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकंदरीत शैक्षणिक परिस्थितीचा विचार करताना त्यांनी आपल्याला नवीन उपक्रम करण्याची गरज आहे असे त्यांना वाटले अणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता विकसित करण्याकरिता आणलेला आगळावेगळा उपक्रम म्हणजेच “फुलोरा” उपक्रम होय.
काय आहे बरं या फुलोरा उपक्रमांमध्ये ? विशेष तर मला सांगायला आवडेल की 2020 सालापासून फुलोरा शिक्षक म्हणून कार्य करत असताना प्रत्यक्ष अनुभव जे काही मला आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. मित्रहो, आपण आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने खडू-फळा पुस्तके याचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो. सकाळी साडेनऊ दहा ला शाळेमध्ये यायचं आपल्याला दिलेले तास शिकवायचे आणि दुपारची भोजनाची वेळ व्हायची त्यानंतर परत दोन तीन तास घ्यायचे आणि सायंकाळी पाच वाजता घरी जायचं, परत पुढच्या दिवशी अशा प्रकारे आमची दैनंदिनी असायची. शिक्षक म्हणून काम करीत असताना नवोपक्रम करण्याची आवड म्हणूनच काहीतरी शिक्षक आपल्या शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रम करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरिता सतत प्रयत्न करीत आहेत. परंतु हे सक्तीचे नसल्याने संपूर्ण जिल्हाभर यामध्ये शिक्षणाची परिस्थिती योग्य त्या प्रमाणात सुधारलेली नव्हती. हे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निदर्शनात आले. त्यावेळेस त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला फुलोरा उपक्रम त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची सुरुवात केली. Covid-19 काळामध्ये सगळीकडे बंद असताना संपूर्ण बाराही तालुक्यातून काही शिक्षकांना बोलवून जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाराही तालुक्यातील सुलभकांना प्रशिक्षण देण्यात आले. बाराही तालुक्यामधून सुलभक येऊन प्रत्येक तालुक्यामध्ये त्याने प्रशिक्षणाची जबाबदारी यशस्वीरित्या स्वीकारली. आपापल्या तालुक्यांमध्ये निवडलेल्या शाळांमध्ये त्यांनी फुलोरा चे प्रशिक्षण दिले. फुलोरा च्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. त्या पुस्तिका पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं की यात काय नवीन आहे बर?. परंतु या सर्व अभ्यासक्रमाला मात्र प्रायोगिक तत्त्वावर राबवित असताना प्रत्यक्षरीत्या अनुभवाद्वारे अध्यापन करणे हे त्या मधलं नवीन होतं. आणि मग त्याच्यावरचे धडे सुरू झाले. त्यावर सुलभकांकडून मार्गदर्शन सुरू झाले. प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक केंद्रावर फुलोरा चे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक केंद्रावर फुलोरा चे शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा होऊ लागल्या आणि बाहेरून तालुक्यातून जिल्ह्यातून फुलोरा तज्ञ मंडळींच्या शाळेवर भेटी होऊ लागल्या. शिक्षकांचे उद्बोधन होऊ लागले. आणि प्रत्यक्ष फुलोरा वर्गाची कार्यप्रणाली सुरू झाली. या फुलोरा च्या प्रत्यक्ष वर्ग अध्यापनामध्ये मग काय अनुभव आले? हे आता मी तुम्हाला सांगतो आहे.
मित्रहो आतापर्यंत आपण विविध शैक्षणिक साधनांचा वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना फुलोरा इथेच आपल्याला काहीतरी करायला प्रव्रृत्त करते. ते म्हणजे तुम्ही प्रत्येक संकल्पना आणि संबोध विद्यार्थ्यांच्या स्पष्ट होईपर्यंत त्यांना शैक्षणिक साधनांचा सक्तीचा वापर करूनच शिकवलं पाहिजे. मग भाषा आणि गणित यातील मूलभूत संकल्पना ज्या आहेत, त्या मूलभूत संकल्पना जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या स्पष्ट होणार नाहीत तोपर्यंत मात्र आपल्याला शैक्षणिक साधनातूनच त्यांना शिकवायचं आहे. हे फुलोराणी प्रत्येक शिक्षकांनाच शिकवलं. मग फुलोरा पूर्व चाचणीचे आयोजन करण्यात आले. चाचणी घेताना वस्तुनिष्ठता यावी म्हणून शिक्षक एकमेकांच्या शाळांमध्ये जाऊन ती चाचणी घेण्याचे नियोजन तालुक्याहून करण्यात आले. आणि मग वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण जाऊन चाचणी घेतली. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष मूल्यमापन केलं आणि विद्यार्थ्यांना कुठे अडचण आहे? कोण विद्यार्थी शब्दावर आहे कोण अक्षरावर आहे कोण जोडा क्षरावर वाक्यावर आहे? हे ठरविले.
फुलोरा प्रथम चाचणी चा निकाल आल्यानंतर आलेली आकडेवारी घेऊन विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्गात अध्यापन त्यांच्या स्तर निहाय घटक काढून करण्यात आले. त्यानुसार फुलोरा ची मार्गदर्शक पुस्तिका वापरून त्या गटनिहाय अध्यापनाचे नियोजन करण्यात आले. या संपूर्ण कामांमध्ये विशेष महत्त्वाची बाब म्हणजे बालभवन निर्मिती होय. “बालभवन” म्हणजे काय? तर भाषा आणि गणित विषयातील संपूर्ण संबोध आणि संकल्पना स्पष्ट करण्याकरिता जे जे शैक्षणिक साहित्य लागतील ते सर्व शैक्षणिक साहित्याची स्व हस्ताने निर्मिती करुन एका व्यवस्थित ठेवलेली मनोरंजक खोली म्हणजेच बालभवन होय. मग या बालभवनाचा वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. गणितातील सर्व संकल्पना संबोध जसे अक्षर ओळख, शब्द, जोडाक्षर, वाक्य, परिच्छेद तसेच गणितातील अंक ओळख, संख्या ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अशा प्रकारच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्याकरिता बालभवनात साहित्यांचा अतिशय खुबीने वापर करण्याचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले. आणि मग सुरू झाला भाषा आणि गणितातील मूलभूत संकल्पनांवर विजय मिळवण्याचा एक अनोखा प्रवास. या मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी रोज मेहनत करून आपापल्या अडचणी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू लागले. भाषा आणि गणितामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती होऊ लागली त्यानंतर विद्यार्थ्यांची झालेली प्रगती तपासणीकरिता दुसऱ्या चाचणीचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या चाचणीमध्ये जो बदल घडून आला तो अगदी सकारात्मक होता. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती ही दिसून येत होती त्यानंतर फुलोरा चे कार्य असेच सतत सुरू राहिले.
विशेष आकर्षण म्हणजे आपण पारंपारिक परिपाठ न घेता शाळेची सुरुवात अगदी फुलोरा चा परिपाठने घेतली. त्यामध्ये आजचे हवामान, आजचे फळ, फुल, रंग, आजचा प्राणी अशा विविधांगी परिपाठानी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. विद्यार्थ्यांना हवामानाची जाणीव होऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ लागला. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण होऊ लागली. आणि हे सतत चालत असताना मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये परत तिसरी चाचणीचे आयोजन करून विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यात आली. या तिसऱ्या चाचणी मध्ये आलेला निकाल मात्र पहिल्या दोन्ही चाचण्या पेक्षा अतिशय सकारात्मक होता. अशाप्रकारे covid-19 नंतर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये हळूहळू फुलोरा उपक्रम पसरत गेला. तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्हा कव्हर करण्याचा मानस आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची यशस्विता सर्व शिक्षकांवर अवलंबून होती. सर्व शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. अध्यापनामध्ये नवीन शैलीचा वापर केला. आणि फुलोरा या उपक्रमाला यशस्वी केलं. म्हणूनच पंतप्रधान कार्यालयाकडून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल घेण्यात आली आणि राष्ट्रीय पुरस्कार करिता या फुलोरा उपक्रमांचे नामांकन सुद्धा झाले आहे.
तर मित्रहो हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता विकासाकरिता साकारण्यात आलेल्या आगळा वेगळा उपक्रम अर्थातच फुलोरा. या सर्व उपक्रमाचे संपूर्ण श्रेय या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांना जाते. यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील प्राचार्य व सर्वडायट टिम, शिक्षणाधिकारी, सर्व बाराही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील विषय तज्ञ मंडळी, आणि बाराही तालुक्यातील फुलोरा अंतर्गत येत असलेल्या शाळातील सर्व शिक्षकांनी मेहनत केली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फुलोरा अध्यापन प्रणालीचा अवलंब करून त्यांच्या त्यांची गुणवत्ता विकास घडवून आणला. म्हणूनच हा उपक्रम यशस्वी झाला. आणि खरोखरच अशा प्रकारचा नवीन उपक्रम गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागातील शिक्षणाची प्रगती करण्याकरिता महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. या बद्दल समस्त सहभागी शिक्षक तज्ञ मंडळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व मंडळी आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद शिक्षणाधिकारी आपल्या सर्वांचे आभार मानून लेखणी इथेच थांबवतो. धन्यवाद!

प्रवीण यादव मंजरमकर
शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोळधा.
पंचायत समिती देसाईगंज जिल्हा गडचिरोली.
मोबाईल- 79729 83787

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here