– कारवाई करण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली शहरातील दारूविक्रेत्यांची यादी सादर करीत अवैध व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने अहेरी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
ग्रामपंचायत आलापल्ली येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध वार्डातील महिलांनी आलापल्ली शहरात सुरू असलेल्या अवैध दारुविक्री ची समस्या मांडली. या अवैध धंद्यांमुळे महिला व तरुण मुलींना त्रास होतो, घरातील कर्तामाणुस दारु पिण्यामुळे घरगुती भांडणाचे प्रमाण वाढले, तरुण मुलं दारु प्यायला शिकत आहेत. यासाठी वॉर्डातील दारुविक्री त्वरीत बंद करावी, अशी मागणी महिलांनी ग्रामपंचायतकडे केली होती. त्यामुळे महिलांची समस्या लक्षात घेऊन आलापल्ली शहरातील विविध वार्डात सुरु असलेली अवैध दारु विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत आलापल्लीने पोलीस विभागाकडे निवेदनातून केली आहे. संबंधित निवेदनावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.