– आंदोलकांनी प्रवासी रेल्वेला लावली आग
The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेची घोषणा करत या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र सदर योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा २१ वर्ष ठेवण्यात आली होती. एकीकडे या योजनेलाच विरोध होत असताना, सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार ही वयोमर्यादा २१ वर्षांवरून वाढवून ती २३ इतकी केली आहे.
अग्निपथ सैन्य भर्ती योजनेच्या विरोधातील आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. बिहारमध्ये या योजनेला तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक भागात या योजनेच्या विरोधात तरूण रस्त्यावर उतरले. लखीसराय आणि समस्तीपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रवासी रेल्वेला आग लावली. यामध्ये ट्रेनच्या दोन बोगी जळून खाक झाल्या.गेली दोन वर्षे सैन्यभरती झालेली नाही. केवळ याच कारणामुळे वयाची ही सवलत दिली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या भरती पासून वयाची मर्यादा ही २१ वर्षे इतकीच राहणार आहे.
शेकडो आंदोलकांनी बलिया रेल्वे स्टेशनवर तोडफोडही केली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवासीही होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी संतप्त आंदोलकांनी दगडफेकही केली.