– तीन आरोपी ताब्यात, सावली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
सावली : अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशा गुप्त माहीतीवरून अचानक नाकाबंदी करून ७८ गोवंशांना जीवनदान देत २७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २२ जून रोजी सावली पोलिसांनी केली. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.
गडचिरोली मार्गे सावली येथून अवैध गोवंशांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती २२ जून रोजी रात्रो सावली पोलिसांना मिळाली असता रात्रो अचानक नाकाबंदी करून सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली मार्गे येणाऱ्या दोन ट्रक ला थांबवून तपासणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये लहान मोठे असे एकूण ७८ गोवंश जनावरे निर्दयपणे कोंबून, पायांना दोर बांधून असल्याचे दिसून आले. दोन्ही ट्रक मधील ७८ गोवंश जनावरे किंमत ७ लाख ८० हजार रुपये व दोन ट्रक एमएच ०४ सीयू ९२९५ व सीजी २४ एस २६७२ क्रमांकाचे ट्रक किंमत २० लाख असा एकूण २७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अब्दुल राजीक अब्दुल रफीक (३६), मो.अस्लम मो . आजम (३४), रेहनुद्दीन फकरुद्दीन (२५) सर्व राहणार मुर्तीजापूर जि . अकोला व ट्रक क्रमांक सीजी २४ एस २६७२ चा चालक फरार आहे. या चारही आरोपीविरूद्ध महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५ ( अ ) , ( ब ) , प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ डी , एफ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११ ९ , मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक माखनिकर, प्रभारी अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे , ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार दर्शन लाटकर , नापोका विशाल दुर्योधन , पो.का धिरज पिदुरकर चालक पुनेश्वर कुळमेथे यांनी केली .