डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ च्या सुधारित धान बियाण्यांचा वापर करा : डॉ. दिपक नगराळे

248

The गडविश्व
गडचिरोली : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर तसेच कृषी विज्ञान केंद्र , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजनेअंतर्गत कृषी संजीवनी साप्ताह मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा कार्यक्रम व सुधारित धान प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन २७ जून २०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगाम लागवडी करिता पीकेव्ही तिलक व पीकेव्ही किसान या सुधारित धान बियाणे प्रात्याक्षिकाकरिता देण्यात आले. सदर कार्यक्रम केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद तसेच संस्थेचे डॉ. चिन्ना बाबू नाईक, वरिष्ठ शात्रज्ञ (कृषी कीटकशात्रज्ञ ) तथा प्रकल्प अधिकारी (आदिवासी उप योजना) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, डॉ. दिपक नगराळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. एन. चंद्रशेखर, शास्त्रज्ञ, कृषी जैवतंत्रज्ञान, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, तसेच कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील नरेश बुद्धेवार, विषय विशेषज्ञ (कृषी हवामान शास्त्र), ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषी अभि.) ह्यांची विशेष उपस्तिथी होती.
कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञानी शेतकऱ्यांना धान पिकाचे उन्नत लागवड तंत्रज्ञान, पेरणी व्यवस्थापन, योग्य जलसिंचन व्यवस्थापन याद्वारे उत्पादकता आणि उत्पादन वाढ कशी होईल यावर विस्तृत मार्गदर्शन केले तर संशोधन संस्थेच्या शास्त्रद्यांनी धान पिका सोबतच कापूस पिकावरील रोग आणि कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
केंद्रीय कापूस मार्गदर्शनपर भाषणात संदीप काळे यांनी जिल्ह्यातील धान व कापूस लागवड याची माहिती देऊन खत व्यवस्थापनात यूरिया ब्रिकेटचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. युरिया ६० टक्के आणि ४० टक्के डीएपी या मिश्रणातून ब्रिकेटिंग मशीन च्या सहाय्याने २.७ ग्राम वजनाची गोळी (ब्रिकेट) करण्यात येते. लावणीनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक रोपाच्या चौकोनात एक गोळी ५-६ से.मी. खोल रोवण्यात यावी. याकरिता प्रती हेक्टरी १७० किलो ब्रिकेट लागतात व याद्वारे पिकास ५६ किलो नत्र अधिक २९ किलो स्फुरद प्रती हेक्टरी दिल्या जाते. त्यामुळे खताच्या वापरात ४० टक्के बचत होते. याद्वारे २०-३० टक्के प्रती हेक्टरी शाश्वत उत्पादनात वाढ होते. त्याचप्रमाणे रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव होतो असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला प्रसारित धान बियाण्याची माहिती देऊन धान लागवड तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले.
डॉ. दिपक नगराळे यांनी धान व कापूस पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन व उत्पादनात बीज प्रक्रियेचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ताथोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरेश मरस्कोल्हे यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील जवळपास ६० आदिवासी शेतकरी बांधवांना धान प्रात्यक्षिक देण्यात आले.
नरेश बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र ) यांनी घरचे बियाणे असल्यास धान पिकाचे पिक रोग मुक्त ठेवण्यासाठी धानाची पेरणी बीज प्रक्रिया करूनच करावे. त्यासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करून बियाणे ओतावे व दोन ते तीन वेळेस बियाणे ढवळून घ्यावे जेणेकरून हलक्या वजनाचे न भरलेले सर्व पोचट बियाणे द्रावणावर तरंगेल अशा तऱ्हेने द्रावण स्थिर झाल्यानंतर तरंगणारे हलके व रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे व तळातील निरोगी बियाणे २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे. पेरणी पूर्वी बियाण्यास व्हिटावॅक्स (कार्बोक्झीम ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डीएस) ३ ग्रॅम / किलो बियाणे या प्रमाणात रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करूनच गादीवाफ्यावर पन्हे टाकावे. असे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here