– जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुकावासीयांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली,१२ जुलै : भामरागड तालुका दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटा वरील पुल व इतर नाले भरून वाहतात परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो. अशावेळी गरोदर मातांच्या प्रसुती दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी नेहता येत नाही. यामूळे इतिहासात पहिलांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता कालच विशेष आरोग्य पथक भामरागडला रवाना झाले आहे.सद्या भामरागड ग्रामीण रूग्णालयात गरोदर मातांसाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पावसाआधीच १९ गरोदर मातांना ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी ५० गरोदर माता राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जवळच असलेल्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहेरघरात असणाऱ्या गरोदर माताही गरजेनूसार भामरागड येथे दाखल होणार आहेत. प्रसुती दरम्यान मातेला काही अडचणी निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेची गरज असते. अशावेळी भामरागड येथे ऑपरेशन व्यवस्था नाही. शासकीय सुविधा या अहेरी येथे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी यांनी गरोदर मातांना अहेरी किंवा गडचिरोली येथे आणण्यापेक्षा आपलाच चमू भामरागडला नेता येईल का याबाबत आरोग्य विभागशी चर्चा करून एक चमू पाठविण्याच्या सूचना केल्या. आता दर सात दिवसांनी हे पथक बदलणार असून दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडविली आहे. दुर्गम भागात पावसाळयात दरवर्षीच माहेर घर किंवा शासकीय दवाखाण्यातील निवारा गृहात गरोदर मातांना ठेवले जाते. प्रसुतीवेळी मातांना आवश्यक आरोग्य सेवा देणे, त्यांना योग्य आहार देणे अशा सोयीसुविधा प्रशासनाकडून दिल्या जातात. परंतू यावेळी खुद्द भामरागड मधेच गरज भासल्यास अगदी सीझर सुद्धा केले जाणार आहे.
” भामरागड येथे ग्रामीण रूग्णालय आहे, परंतू जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनूसार पहिल्यांदाच आम्ही उपजिल्हा रूग्णालयाप्रमाणे शस्त्रक्रियेच्या सुविधा तिथे पुरवित आहोत. यामधे तज्ञ डॉक्टरर्स तर आहेतच परंतू शस्त्रक्रियेसाठी लागणारे रक्त साठा, व्हेंटीलेटरसह इतर आवश्यक उपकरणे दिली आहेत. रोटेशन पद्धतीने ही टीम काम करणार असून पुर्वीचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे रीक्त असलेले पदावरतीही अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे.”
डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली