The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे शहरात जिवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगर परिषद तर्फे मान्सुनपुर्व सर्व्हक्षण करुन ३९ धोकादायक इमारत पाडण्याबाबत नोटीस बजावलेले आहे. तसेच मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचे अनुषंगाने पुन्हा प्रत्यक्ष सर्व्हे करुन त्यातील १२ अतिधोकादायक इमारती निश्चित केलेल्या आहेत व अशा इमारतीचे मालक, वहिवाटदार यांना २४ तासाच्या आत स्वत:च्या स्तरावर प्रत्यक्ष भेटून नोटीस बजावून इमारती रिकाम्या करण्यास पाडुन टाकण्यास नोटीस बजावण्यात आले आहेत.
मालमत्ता धारक, किरायेदार यांनी नगर परिषदेचे नोटिसला न जुमानता जीर्ण इमारतीचा वापर सुरुच ठेवलेला आहे. अशा परिस्थितीत सद्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारत कोसळुन जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी संबंधीत मालमत्ताधारकांनी २४ तासाचे आत जीर्ण इमारतींचा वापर थांबवून इमारत मोकळी करुन स्वत:च्या स्तरावर पाडून टाकावे अन्यथा नगर पालिका प्रशासनातर्फे अति धोकादायक इमारत रिकामी करुन पाडण्यास येईल व याकरीता नगर परिषदेस येणारा खर्च संबंधिताकडून मालमत्ता कराचे थकबाकीप्रमाणे वसुल करण्यात येईल याची संबंधीत मालमत्ताधारकांनी नोंद घ्यावी असे मुख्याधिकारी, नगरपरिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.