– जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जारी केले नवे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, १७ जुलै : जिल्हयातील पुरस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायायोजनेअंतर्गत ११ जुलै ते १६ जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता शाळा, महाविद्यालय व इतर सर्व बाबी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले होते. मात्र पुन्हा हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट घोषविल्याने बुधवार २० जुलै २०२२ पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी नवे आदेश जारी करत कळविले आहे.
जिल्हयात १० जुलै पासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिल्हा प्रशासनाने ११ ते १६ जुलै दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी बुधवार २० जुलै २०२२ च्या मध्यरात्री पर्यंत वाढ केली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. त्यामूळे नैसर्गिक आपत्तीला टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. यामूळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, बुधवार २० जुलै २०२२ चे २४.०० वाजेपर्यंत शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीना यांनी कळविले आहे.