– अतिवृष्टीमुळे रस्ता गेला वाहून
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ जुलै : जिल्हा परिषद क्षेत्र रांगी -येरकड अंतर्गत येणाऱ्या कन्नाळगाव ते धुसानटोला रस्त्यावरती मोठा खड्डा पडलेला आहे. तर यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याची चाळण झाली असून रस्ताच वाहुन गेल्याने मार्गावर प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.धानोरा तालुक्यातील कन्हाळगाव पासुन ५०० मिटर अंतरावर धुसानटोला मार्गावर बंधारा बांधलेला आहे. सततच्या अतिवृष्टीने बंधाऱ्याच्या पाण्याने प्रवाहाचा मार्ग बदलला आणि बाजुने रस्ता वाहून गेल्याने रस्ताच दिसेनासा झाला. खड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जिवित हानी व वाहनांची मोठी नुकसान होवु शकते. रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या बंधाऱ्यामुळे अतिवृष्टीने पाण्याने बाजूने मार्गक्रमण करीत मूळ रस्त्यालाच खोदून नेल्याने जवळपास पूर्ण रस्ता वाहून गेल्याने सध्या तरी हा रस्ता निकामी झालेला आहे. पूर परिस्थितीमुळे रस्त्याची क्षमता अधिकच खालावली गेली आहे. हल्ली रस्त्याची अवस्था बघितली असता रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे बाहेर पडले असून मोठमोठाले खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक किंवा प्रवास करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खोलवर पडलेल्या खड्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठा अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करुन रस्ता सुरळीत करण्यात यावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.