– एटापल्ली तालुक्यातील ८ शाळांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी व शाळा घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. सत्र २०२२-२३ मध्ये एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ८ शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ५४२ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरविले.
एटापल्ली तालुक्यातील ८ शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आणण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच तालुका संघटक किशोर मलेवार यांनी गीत, तार टपाल टेलिफोन, डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करून व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगितले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला आहे.
या उपक्रमात एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गुरुपल्ली जिप शाळेतील ६० विद्यार्थी, कमके ३० विद्यार्थी , पंदेवाही ३५ विद्यार्थी, हेडरी येथील विनोबा भावे आश्रम शाळेतील २५० विद्यार्थी, बुर्गी जिप शाळेतील १०४, करेम १६ विद्यार्थी, फुंडी १२ व जवेली जिप शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा एकूण ५४२ विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय हे हसत-खेळत पद्धतीने, सांगत त्याचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.