– कुरखेडा तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, २० जुलै : कुरखेडा (Kurkheda) तालुक्यातील जंगलपरिसरात हातभट्ट्या लावून अवैध दारू गाळली जात आहे. त्यामुळे जंगलपरिसरात टाकलेला मोहफुलाचा नष्ट करून कारवाई करण्यासाठी तालुक्यातील तिन्ही वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र देण्याचा निर्णय दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत आयोजित तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कुरखेडा तहसील कार्यालयात तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी, संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, गटशिक्षणाधिकारी पी. एम. शिवणकर, पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, तालुका समितीचे सचिव तालुका संघटक मयूर राऊत, वनविभागाचे प्रतिनिधी एम. एम. हलामी, राष्ट्रीय तबाखू नियंत्रक कार्यक्रमाचे समुपदेशक निशा चचाने, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक सूरज मेश्राम, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधा नाकाडे, आशा बानबले, तालुका प्रेरक विनोद पांडे आदी उपस्थित होते.
बैठकीत संवर्ग विकास अधिकारी यांच्या आदेशान्वये ग्रामसेवक यांच्याद्वारे गाव पातळीवरील सर्व पानठेले व किराणा दुकानधारकांना सुगंधित तंबाखू विक्री बंद करण्याबाबत सूचना देणे. न.पं मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये शहरातील सर्व पानठेले व किराणा दुकानांना सुगंधित तंबाखुची विक्री बंद करण्याबाबत नोटिस देणे व प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे. शहरातील प्रत्येक वॉर्डात समिती गठीत करून अवैध दारूविक्री व तंबाखूजन्य पदार्थ बंद करण्यासाठी कार्य करणे. तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यसनमुक्त राहण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत देणे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्याविषयी आदेश दिला जाईल. गरोदर व स्तनदा मातांचा कार्यक्रम घेण्याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे सर्व अंगणवाडी सेविकेला आदेश दिला जाईल. पोलिस विभागाद्वारे शहरातील व शहरालगतच्या गावातील अवैध दारू विक्री बंद करणे. महिलांच्या सभेत अवैध दारू व तंबाखू विक्रीबंदी बाबत जनजागृती करण्याचे आदेश देणे. पथनाट्य सादर करून अवैध दारू व तंबाखू विक्री बंदी व होणाऱ्या आजाराबद्दल जनजागृती करणे. व्यसन उपचार शिबिराचा प्रचार करण्यासाठी नगरपंचायत मार्फत फिरणाऱ्या घंटा गाडीवर ऑडिओ क्लिपद्वारे प्रचार करण्याविषयी आदेश नगरपंचायत विभागाला दिला जाईल. दारूचे व्यसन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी व्यसन उपचार घ्यावा. असा आदेश तहसीलदार यांनी सर्व विभागांना दिला.