– कुरखेडा येथे वृत्तपत्रे वाटप करणाऱ्या मुलांचा सत्कार
The गडविश्व
गडचिरोली , २१ जुलै : समाजात आज दैनंदिन वृत्तपत्रे वाटप करून मोठ्या झालेल्या व्यक्ती अनेक आहेत. मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन वृत्तपत्रे वाटप करताना वृत्तपत्रे वाचन करून जीवनात यश संपादन करावे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले. नुकतेच कुरखेडा येथील संगीताताई ठलाल यांनी स्वगृही एक प्रेरक उपक्रम आयोजित केलेला होता. त्यात घरोघरी दैनिक वृत्तपत्रे वाटप करणाऱ्या विद्यार्थी व युवकांच्या सत्कार उपक्रम प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
परिसरात परिचित कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई ठलाल यांनी स्वगृही नुकताच एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले. त्यात ठलाल यांच्यातर्फे घरोघरी दैनंदिन वृत्तपत्रे वाटप करणारे विद्यार्थी व युवक विवेक वालदे, योगेश्वर शेंडे, राकेश सोरते, टोमेश्वर बुरबांधे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू- छत्री देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी वृत्तपत्र वितरक युवकांना मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर म्हणाले की, समाजात आज दैनंदिन वृत्तपत्रे वाटप करून मोठ्या झालेल्या व्यक्ती अनेक आहेत. आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. दैनिक वृत्तपत्रे वाटप करताना ती वृत्तपत्रे वाचन करत जाऊन व्यावसायिक व स्पर्धा परीक्षा देत जाव्यात. उच्च शिक्षण जीवनात जीवनात यश संपादन करावे, असेही ते पुढे म्हणाले.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध कलावंत डॉ.परशुराम खुणे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, विशेष अतिथी नाट्य कलावंत खुशाल फुलबांधे, प्रा.विनोद नागपूरकर, वृत्तपत्र वितरक तेजांनद लांजेवार, आयोजीका संगीता ठलाल, शिक्षिका लता राऊत, भोजराज कापगते उपस्थित होते. यावेळी डॉ.परशुराम खुणे, खुशाल फुलबांधे, प्रा.विनोद नागपूरकर व शिक्षिका लता राऊत यांनी संगीताताई ठलाल यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजिका कवयित्री संगीताताई ठलाल, सूत्रसंचालन व आभार प्रा.विनोद नागपूरकर यांनी मानले.