पिढी गारद होण्याच्या मार्गावर…!

682

आजची पिढी काय करत आहे? असा कुणालाही प्रश्न केला तरी सामान्यातील सामान्य माणूस सांगेल की आजची पिढी मोबाईलच्या आधिन झाली आहे. आज मोबाईल निव्वळ एक संपर्काचे साधन उरलेले नाही. तर ते वेळ घालवण्याचे साधन झाले आहे.
शालेय वातावरणात आता मुले सर्रासपणे मोबाईलचा वापर करताना दिसतात. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण चालू झाले .पण हेच ऑनलाईन शिक्षण इतके घातक झाले आहे की,विद्यार्थी मोबाईलवर शिक्षण घेण्यापेक्षा व्हिडीओ, चॅटिंग, गेम्स, फेसबुक ,व्हाट्सअप, ट्विटर ,इंस्टाग्राम इत्यादीमध्ये अतिशय व्यस्त झाली आहे. ज्या गरीब आई-वडिलांनी जीवाचे हाल करून मुलांच्या शिक्षणासाठी महागडे मोबाईल घेऊन दिले. तो प्रामाणिक उद्देश तर दुरच राहिला. पण त्याच मोबाईलमुळे घरातील आनंदी वातावरण मात्र पार बिघडवून टाकले. आई-वडील कामावरून येतो तेव्हा मुले मोबाईलवर तासनतास खिळून असतात. त्यांना घरात कोण आले आहे याचे भानही राहत नाही. परवा परवाची गोष्ट आहे. अकरावीच्या वर्गात गेलो असता ,मागच्या बाकावर कोपऱ्यात बसणारा मुलगा मोबाईलवर गेम खेळण्यात एवढा गुंग होता की त्याला वर्गात शिक्षक आल्याचे भान राहिले नाही. जेव्हा तो भानावर आला तेव्हा फार दचकलेला, घाबरलेला, बेचैन झालेला दिसला. त्याला भानावर यायला दहा मिनिटे लागली.
ज्या आई-वडिलांनी कधी स्वतः साठी दहा हजार रुपये कधी खर्च केली नसेल ,गर्मी होते म्हणून कधी थंड हवेसाठी कुलर घेतला नसेल ,त्या आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रक्ताचे पाणी करून महागडे मोबाईल घेऊन दिले. त्याला काय वाटेल याची खंत मुलांना अजिबात नाही. शिक्षणासाठी मोबाईलचा वापर पाचशे रुपये भरून निघेल एवढा सुध्दा होत नाही. त्यापेक्षा पाचशे रुपयांची पुस्तके उपलब्ध करून दिली असती तर काही सकारात्मक फायदा तरी झाला असता.
इथे समंज पालकांनी सुध्दा जागं व्हायला हवं आहे. मुल रडले तर आईने त्याला जिव्हाळ्याने ,ममतेने , कुशीत घ्यावे, कवटाळावे. असे न करता आजच्या आधुनिक आईने मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि त्याचे रडने थांबले तर समजून जावे …आईची जागा बदलत आहे. इथे आई अपयशी ठरली आहे. आईची जागा जर का मोबाईलने घेतली तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होईल. जे मानव जातीला सोडवता येणार नाही. या जीवनशैलीमुळे मनोरुग्णता वाढत आहे. पुढचे आरोग्याचे प्रश्न हे मेंदूशी निगडीत असेल. मेंदूचा कर्करोग, डोळ्यांचे आजार, मानसिक आजार इत्यादी.
आजची ही पिढी बरबाद होण्यापासून माध्यम, कलावंत, साहित्यीक, नेतृत्व करणारे यांनी व्यक्तीगत अहंकार बाजूला सारुन काम केले पाहिजे. निव्वळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता बाजूला ठेवून या पिढीला बरबाद होण्यापासून वाचवले पाहिजे.
– आर.केदार
7083956517

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here