– तलाव परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
The गडविश्व
चंद्रपूर/नागभीड,२९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या ब्रिटीश कालीन घोडाझरी तलावात पर्यटक इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २८ जुलै रोजी उघडकीस आली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून तलाव परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. मधुकर कामडी (४५) रा. चिंधीचक असे मृतकाचे नाव आहे.
नागभीड तालुक्यात घोडाझरी येथे ब्रिटिश कालीन तलाव आहे. सततधार पावसाने हे तलाव ओवरफ्लो वाहत असून या ठिकाणी दूरवरून दररोज हजारोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. काल २८ जुलै रोजी चिंधीचक येथील मधुकर कामडी हे तलावात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभागाला देण्यात आली व मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
घोडाझरी येथे जाण्याकरिता नागभीड-सिंदेवाही या मुख्य मार्गावर असलेल्या मुख्य प्रवेश द्वारातून जावे लागते. मुख्य प्रवेश द्वारावर पर्यटकांची नोंद केल्या जाते मात्र तलाव परिसरात कोणतीही सुरक्षितता आढळून येत नाही. कोणतीही सुरक्षितता नसल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दारू सुरू असल्याने अनेक शौकीन दारू पिऊन सुद्धा जात असल्याचे पर्यटकांकडून ऐकण्यात आले आहे तर या ठिकाणी महिला सुद्धा येत असल्याने टवाळक्या करणारे, तसेच दारू प्राशन करून शिवीगाळ करणाऱ्यांचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत असल्याचेही कळते. तर अनुचित घटना सुद्धा घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे. तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने आता प्रशासन काय कारवाई करते, तलावावर पर्यकांना येणास मज्जाव करण्यात येणार काय ? आतातरी सुरक्षा व्यवस्था करणार काय याकडे पर्यटकांचे लक्ष लागून आहे.