– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातुन मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : जिल्ह्यामध्ये एकमात्र रेल्वे स्टेशन वडसा येथे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे आहे. गोंदिया ते चांदाफोर्ट या २६२ किमी च्या मार्गावर गाडीला एकही थांबा नसल्याने जनतेमध्ये वाढता असंतोष दिसून येत आहे. त्याकरिता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी वडसा व नागभीड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा तसेच पॅसेंजर गाड्यांसाठी सालेकसा थांबा देण्याकरिता यासंदर्भातील निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले.
गोंदिया, नागभीड,चांदाफोर्ट या २६२ कि.मी च्या मार्गावर एकही थांबा देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जसे जबलपूर चांदाफोर्ट एक्सप्रेस ( 22174 – 22173), सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस (17007 – 17008), बिलासपुर चेन्नई एक्सप्रेस (12851 – 12852), यशवंतपुरम कोरबा व वैनगंगा एक्सप्रेस (12251 – 12252), हैदराबाद आर.एक्स.एल. (17005 – 17006), एंव गया चेन्नई एक्सप्रेस (12389 -12390), इत्यादी या मार्गावरील सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा तसेच पॅसेंजर गाड्यांसाठी सालेकसा येथे देण्याकरिता याची दखल घेत खा.अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देत या मार्गावरील एकमेव जंक्शन असलेल्या नागभीड व गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा त्याकरिता सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा व पॅसेंजर गाड्यांसाठी सालेकसा येथे देण्याची मागणी केली.
तसेच गोंदिया नागभीड- चांदाफोर्ट या मार्गावरील कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर गाड्या अजूनही सुरु करण्यात न आल्याने दैनंदिन प्रवास करणारे चाकरमानी व प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून वेळेचाही अपव्यय होत आहे. या संदर्भात सुद्धा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याच्याशी पॅसेंजर गाडी सुरु करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.
आदिवासीबहुल व जंगलव्याप्त गडचिरोली लोकसभा क्षेत्रात एकही थांबा नसल्याने नाराजी व्यक्त करीत या मार्गावरील नागभीड व वडसा या महत्वपूर्ण स्टेशनवर या गाडीचा थांबा देण्यात यावा. तसेच पॅसेंजर गाड्यांसाठी सालेकसा येथे थांबा देण्यात यावा. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
याप्रसंगी खा.अशोक नेते, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, भाजपाचे जेष्ठ नेते मनोज वठे उपस्थित होते.
