The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : जुलै महिन्यामध्ये संपूर्ण भारतात खूप मुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती नद्यांना महापूर आले. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील या नदीकाठावरील बऱ्याच गावांमध्ये पुराचे पाणी शिरले व गावातील घरांचे बरेच नुकसान झाले. घरे पडली, घरातील वस्तू वाहून गेल्या, गुरे-ढोरे यांना सुद्धा या महापुराचा चांगलाच फटका बसला. गावातील लोकांनी हाताला येईल ते साहित्य घेऊन गावातून स्थलांतर केले. जिथे जागा मिळेल तिथे लोक कशातरी झोपड्या करून राहू लागले. अशातच रिलायन्स फाउंडेशनने पूर पीडितांना मदत करण्याचे ठरविले व सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या मदतीने रिलायन्स फाउंडेशनचे धम्मदीप गोंडाने व मनोज काळे यांनी पूरग्रस्त गावांची यादी घेऊन या गावांची पाहणी करून गावातील पुरपीडितांच्या भेटी घेऊन त्यांना चांगल्या झोपड्या उभारता याव्या यासाठी ५०० ताडपत्र्याचे वाटप केले.
लोक रस्त्याच्या कडेला तसेच जंगलामध्ये राहत असल्यामुळे मच्चारांचा सुध्दा त्यांना खूपच त्रास होत होता त्यासाठी ५०० मच्छरदाणी सुद्धा वाटण्यात आल्या. या सर्व वाटप कार्यक्रमामध्ये त्या त्या गावातील तलाठी, सरपंच तसेच सौ. रंजना बोबडे, मंडळ अधिकारी, कृषी विभाग, सिरोंचा, सचिन आत्राम कृषिसहाय्यक, रवी बॉंगोई, जगदीश वेलम व अमितकुमार त्रिपाठी यांची सुद्धा खूप मदत झाली.