सावधान, भीसी काढत आहात ; गडचिरोलीत झाली लाखोंची फसवणुक

1551

– तक्रारदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑगस्ट : झटपट श्रीमंत होण्याकरिता वेगवेगळया गैरमार्गाचा वापर करुन मोठी रक्कम मिळविण्याचा प्रयत्न नागरिक करीत असतात. मात्र असे करत असतांना मोठा गंडा लागण्याची सुद्धा शक्यता असते. गडचिरोलीत अशाच पद्धतीने भीसी या प्रकारातून मोठी रक्कम वसूल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनु जमशेद ठाकुर, इकरार जमशेद ठाकुर, करीष्मा सोनु ठाकुर व छगन शरद जेंगठे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपराध क्रमांक ४१३ / २०२२ कलम ४०६, ४२०, ३४ भादंवि सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील नामवंत व्यक्तींनी झटपट श्रीमंत होण्याकरिता भीसी मध्ये मोठी रक्कम गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी आपसात संगनमत करून तक्रारदार व इतरांना फसविण्याच्या हेतुने आपल्या कडील भीसीत रक्कम जमा केल्यास, रक्कम जमा करणाऱ्यास १.५ टक्के दराने कमिशन मिळेल व दरमहा कमिशन घेतले नाहीतर भीसीच्या मुदतपुर्तीनंतर मोठया रकमेचा परतावा देण्यात येईल असे प्रलोभन व आश्वासन दिले. आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडुन तक्रारदार व इतरांनी आरोपी सोनु जमशेद ठाकुर याच्याकडे भीसीची रक्कम जमा केली. परंतु मुदत पुर्तीनंतर तक्रारदार यांना त्यांचे ३०,००,०००/- रुपये व त्यावरील कमीशन परत न करता आरोपींनी फसवणुक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
या गुन्हयातील आरोपीविरुध्द तक्रार असलेल्या लोकांनी उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडचिरोली या ठिकाणी संपर्क साधवा. असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here