– शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा देण्याच्या मागणीकरिता आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याच्या वतीने चक्काजाम आंदोलन
– मागणी पुर्ण होतपर्यंत आंदोलन स्थळावरून न उठण्याचा आंदोलकांनी घेतला होता पवित्रा
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यासह गडचिरोली जिल्हयातील कृषी पंपाना 24 तास विजपुरवठा देण्यात यावा याकरिता सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनादरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांना सायंकाळच्या सुमारास पोलिसांकडून अटकाव करण्यात आला आहे.
कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी आज सोमवार १० जानेवारी रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांनी देसाईगंज येथील उपकार्यकारी अभियंता वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
त्यानुसार आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, पं.स. सभापती रेवता अलोणे, पं.स. सदस्य मोहन गायकवाड, शेवंता अवसरे, नगरसेवक राजू जेठाणी, योगेश नाकतोडे, पंकज खरवडे, दिवाकर पेट्टेवार आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
चक्काजाम आंदोलनादरम्यान मार्गावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती. वडसा-आरमोरी तसेच वडसा-कुरखेडा मार्गावर वाहनांची लाबंच लाब रांग लागली होती.
गडचिरोली जिल्हयातील नागरिक हा शेती व्यवसायावर अवलंबुन आहे. येथील शेतकरी सिंचन सुविधेसाठी 24 तास विजेवर अवलंबून असतांना 8 तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने अडचणीत सापडला आहे. तालुक्यासह जिल्हातील कृषी पंपांना 2४ तास सुरळित विज पुरवठा देण्यात यावा अन्यथा 10 जानेवारी पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरेालीचे जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे दिला होता. सायंकाळच्या सुमारास आमदार कृष्णाजी गजबे यांना पोलिसांच्या वतीने अटकाव करण्यात आला.
यावेळी आमदार कृष्णाजी गजबे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी राहू त्याकरिता आपण मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांशी पत्राद्वारे संपर्क करून शेतकऱ्यांच्या अडचणी मार्गी लावू असे आश्वासन दिले.