The गडविश्व
गडचिरोली,२२ ऑगस्ट : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथे चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच, देसाईगंज पोलिस व मुक्तिपथ गाव संघटनेने संयुक्तरित्या कारवाई करीत विक्रेत्यांकडून दारू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शंकरपूर येथे ग्रामपंचायत समितीने अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला व्यवसाय सुरूच ठेवल्याची माहिती मिळाली. अशातच गावाला दारूमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत समितीने पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच गावातील महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून दारूमुक्त गाव करण्याची ओवाळणी मागितली होती. त्याअनुषंगाने वचनाचे पालन करीत पोलिसांनी दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता, दोन घरात देशी-विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून यापुढे दारूविक्री करणार नाही असे शपथपत्र लिहून घेण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, कृष्णा कुवारे, पोलिस पाटील उषा बुद्धे व मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.