– ‘The गडविश्व’ न्यूज च्या बातमीची दखल
The गडविश्व
ता. प्र. / धानोरा ,२३ ऑगस्ट : तालुक्यातील मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती तसेच जवळपास ३ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे बोलल्या जात होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात होती. याबाबत गडविश्व न्यूज ने १६ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली असता, खरेदी योजना हंगाम २०२१-२२ मधील हंगामात ९,८७८. ९५ क्विटंल धान्य खरेदी केद्रावरील पुस्तक साठ्यात शिल्लक नसल्याने निदर्शनात आले. याप्रकरणी शासनाचे आर्थिक नुकसान केले असल्याचा ठपका ठेवत उपप्रादेशिक व्यवस्थापक धिरज सुंदरलाल चौधरी व प्रतवारीकर तथा प्रभारी विपणन निरिक्षक राहूल नानाजी कोकोडे यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला, भाप्रसे यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यासंदर्भातील पत्र २२ ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले.
उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था खरेदी केंद्र मुरूमगाव येथे आधार भूत खरेदी योजना हंगाम २०२१-२२ मध्ये खरीप पणन हंगामात २७,६५८.७० क्विंटल व रब्बी पणन हंगामात ६,१०.८० क्विंटल अशी एकुण ३३,६६९.५० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली असून त्यानुसार धान भरडाईचे डीलिव्हरी आदेश प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांच्याकडून देण्यात आले होते. प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली यांनी खरेदी केंद्र मुरूमगाव येथे तपासणी करिता भेट दिली असता खरीप व रब्बी हंगामातील अंदाजे ९,८७८.९५ क्विंटल धान्य साठा पुस्तकाप्रमाणे शिल्लक असणे आवश्यक होते . मात्र प्रत्यक्षात धानसाठा एकही शिल्लक नसल्याचे दिसून आले. तपासणीअंती शिल्लक साठा केंद्रावर उपलब्ध नसल्याने संस्थेचे सचिव एल.जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धिरज सुंदरलाल चौधरी व प्रतवारीकार तथा प्रभारी विपणन निरीक्षक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा राहुल नानाजी कोकोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नाही. खुलासा असमाधानकारक व मोका पंचनामा नुसार धानाचे वजन ९,८७८.९५ क्विंटल असून त्याची किंमत हमी भावाप्रमाणे १,९१,६५,१६३ (एक कोटी एक्कान्नव लाख पासष्ठ हजार एकशे त्रेसष्ठ) तसेच नियमाप्रमाणे संस्थेकडून दीडपटीने वसूल पात्र असलेली रक्कम २, ८७,४७,७४४.५० (दोन कोटी सत्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार सातशे चौरेचाळीस रुपये पन्नास पैसे) व बारदाण्याची किंमत १५,०८,५५३.८४ ( पधंरा लाख आठ हजार पाचशे त्रेपन्न रुपये चौऱ्यांशी पैसे ) असे एकूण ३,०२,५६,२९८.३४ ( तिन कोटी दोन लाख छप्पण हजार दोनशे अठ्ठ्यान्नव रुपये चौतिस पैसे) इतक्या रकमेचा अपहार करून महामंडळाचे व शासनाचे आर्थिक नुकसान केलेले असल्याने उपप्रादेशिक कार्यालय, धानोरा येथील उप प्रादेशिक व्यवस्थापक धिरज सुंदरलाल चौधरी व प्रतवारीकर तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल नानाजी कोकडे यांनी आपल्या कर्तव्यात व जबाबदारीत कसूर केल्याचे कारण दाखवीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम व महामंडळ सेवा नियम (शिस्त व अपील ), १९७९ भाग-२, नियम क्रमांक ४ व महामंडळाचे सेवानियम क्रमांक ७९ अन्वये उप प्रादेशिक कार्यालय, धानोरा येथील उप प्रादेशिक व्यवस्थापक धिरज सुंदरलाल चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
उपप्रादेशिक व्यवस्थापक धिरज सुंदरलाल चौधरी यांना त्यांचे निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी इत्यादी कालावधीतील प्रदाने) नियम, १९८१ चे नियम ६८ अन्वये निलंबित केलेल्या दिनांकापासुन निर्वाह भत्ता देय राहील. तसेच निलंबन कालावधीत वैयक्तिक उद्योगधंदे वा अन्य नोकरी करता येणार नाही, असे केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदींचा भंग केला असे समजण्यात येईल व ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरतील व त्यांचा निलंबन भत्ताही नाकारला जाणार आहे.
चौधरी यांच्याकडील उपप्रादेशिक व्यवस्थापक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा या पदाचा अतिरिक्त पदभार हिम्मतराव सोनवणे उपप्रादेशिक कार्यालय आरमोरी यांच्याकडे सोपविण्यात आला असून चौधरी हे निलंबन कालावधीत मुख्यालय म्हणून प्रादेशिक कार्यालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.
हे हि वाचा : मुरुमगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा