गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन
माझ्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बांधवांची विशिष्ट व पावन अशी संस्कृती आहे. त्यांचे पेरसा पेन हे दैवत आहे. ते शुभ कार्याप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर रेला नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ढोल हे सुद्धा त्यांचे आवडीचे वाद्य आहे. होळी, पोळा, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे. जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे पोळा, गणपती, दसरा, दिवाळी, होळी, ईद, नाताळ, बुद्धपौर्णिमा इत्यादी सण गुण्यागोविंदाने साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध दंडार, नाटक, तमाशा, सोंग, कव्वाली, इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचे दिवाळी ते होळी या कालावधीत विविध भागात आयोजन केले जाते. यामुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. गणपती, दसरा, होळी आदी सणांचे वेळी तसेच शंकरपट, मंडई, जत्रा, गळ यांच्या निमित्ताने आयोजन होते.
गडचिरोली जिल्हा हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली व सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून सर्वश्रुत आहे. जिल्हा जवळपास ७६ टक्के घनदाट जंगलाने व्यापलेला असल्याने त्यांत नक्षलसमर्थक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१२ चौकिमी आहे. हा जिल्हा नागपूर विदर्भ प्रदेशात मोडतो. जिल्ह्याचे मुख्यालय गडचिरोली येथे आहे. त्यातील तालुके अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज- वडसा, धानोरा, भामरागड , मुलचेरा, सिरोंचा असे एकूण १२ आहेत. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचे स्थान हे राज्याची राजधानी मुंबईच्या विरुद्ध दिशेला शेवटच्या टोकावर आहे.
जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे. येथे बहुजन समाजही येथील आदिम संस्कृतीशी एकरुप झालेला आढळतो. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासीबहुल जिल्हा समजला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, हलबा, कोलाम, माडिया, बडा माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा गोंडी, माडिया, हलबी आदी आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात. फार प्राचीन काळी या प्रदेशावर राष्ट्रकूटांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. सन १८५३मध्ये बेरार हा चंद्रपूर- पूर्वीचा चांदा प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. सन १८५४मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी सन १९०५मध्ये चंद्रपूर व ब्रह्मपुरी यांतील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली होती. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग सन १९५६पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्य पुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. सन १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. दि.२६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा हा भारताचा ५५६वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. वैनगंगा नदीला सीमारेषा मानून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
जिल्ह्यात दोन नगरपालिका असून त्या गडचिरोली व वडसा येथे आहेत. येथील महाविद्यालये ही गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत येतात. शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व गव्हर्नर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज, गडचिरोली हे येथील वैभव समजले जाते. या जिल्ह्यात गोंडवाना सैनिकी विद्यालय नावाचे एक लष्करी शिक्षण विद्यालय आहे. प्रेक्षणीय स्थळे मार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड. हेमलकसा व कामलापूर ही आहेत. येथील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव हे मार्कंडेश्वराचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहेत. तर कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किमी अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खुप मोठी मारुतीची मूर्ती आहे. या तिन्ही ठिकाणी महाशिवरात्रीला खुप मोठी यात्रा भरते. मार्कंडा देवस्थानास विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध डॉ.अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांचे सर्च- शोधग्राम, गडचिरोली ही संस्था तेथील आदिवासी बांधवांना आरोग्यसेवा पुरवते. तर डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी हेमलकसा व भामरागड ही संस्थादेखील आदिवासी बांधवांना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते. हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. धान- भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस, उडिद, मूग, भुईमूग, भाजीपाला, इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. सुशिक्षित तरुणवर्गास गाईगुरे व शेळ्या राखण्याशिवाय पर्याय नाही. बेरोजगारीने त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होत आहे. यामुळे जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत, मात्र मोठे उद्योग नाहीत, विकास नाही. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्याच्या नशिबी फक्त १८.५ किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथेच ब्रिटिश कालीन रेल्वेचे छोटेखानी स्टेशन आहे. जिल्हाला एकच मोठी बाजारपेठ आहे, ती वडसा- देसाईगंज येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले असून जिल्ह्यातील एकमेव रेल्वे लाईन गोंदिया-नागभीड-चंद्रपूर येथून जाते. त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालय फक्त नाममात्र आहे. येथील लोकप्रतिनिधी स्वार्थ अधिक साधतात; तर माझ्या जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्षच करतात, हे येथे विशेष उल्लेखनीय !
!! The गडविश्व परिवारातर्फे गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन सप्ताह निमित्त सर्व जिल्हावासीयांना हार्दिक शुभेच्छा !!
निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
(वैभवशाली भारताच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक)
गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.