– तालुक्यातील चुरचुरा येथील घटना
The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑगस्ट : जिल्हयातील आरमोरी तालुक्यात २९ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज ३० ऑगस्ट रोजी ऐन हरितालीका दिनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावार असलेल्या पोर्ला वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चुरचुरा जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरिता गेली असता गुराखी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. पार्वता नारायण चौधरी (६०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पार्वता नारायण चौधरी ही जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरिता गेली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वता चौधरी वर हल्ला करून नरडीचा घोट घेतला यात ती ठार झाली. घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली.
जिल्हयात दिवसेंदिवस वाघाचे मानवावरील हल्ले वाढत असल्याने मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता असून नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी वारंवार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र वनविभाग यात सपशेल अपयशी ठरत आहे. सततच्या घटनेने वनविभागाप्रती नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.