The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा (चेतन गहाणे) दि. २९ : कुरखेडा येथील नवीन बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर एका स्थानिक व्यावसायिकाने सर्रासपणे गिट्टी साठवणूक आणि विक्री सुरू केल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही अतिक्रमणाची समस्या नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करत आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अंतर्गत रुंदीकरणाचे काम सुरू असताना, अशा अडथळ्यांमुळे कामात व्यत्यय येत असून, नागरिकांचा रोष वाढत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या कडेला गिट्टीचे ढिगारे उभे राहिल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“रात्रीच्या वेळी गिट्टी लक्षात न आल्यास अपघात अटळ आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते,” असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नाराजी वाढली आहे.
अशा प्रकारचे अतिक्रमण हे मोटार वाहन कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांचे उल्लंघन आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या गिट्टी साठवणुकीवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“अपघात घडल्यानंतर कारवाई करून उपयोग नाही; प्रश्न आधीच मिटवायला हवा,” अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल, अशी आशा असून, विलंब झाल्यास जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkheda #ipl2025 )