– पोलीस वाहन चालक पदी निवड
माझे नाव आशिष विनोद सहारे मु.पोस्ट. चामोर्शी माल ता. आरमोरी जि.गडचिरोली. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा, घरी आई,बाबा, बहीण आम्ही घरात चार लोक सर्व सुरळीत होते. बहिण अभ्यासात हुशार होती म्हणून बाबा बहिणीचा जास्तच लाड करायचे मी थोडा बुद्धीला कमी होतो म्हणजेच अभ्यासात ‘ढ’ होतो त्यामुळे माझी चिंता नेहमी माझ्या आई-वडिलांना असायची. पहिली ते चौथी माझे प्राथमिक शिक्षण चामोर्शी माल या ठिकाणी झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वासाळा या गावी झाले दहावी मध्ये मला फक्त ४८ टक्के मार्क मिळाले आणि घरी चिंतेचा विषय बनला की, हा भविष्यात कसा होईल. पुढे ११ वी व १२ वी ला मी वैरागड या ठिकाणी प्रवेश घेतला. घरच्यांचा एकच स्वप्न होते की तुला शिक्षक व्हायचे आहे. त्यासाठी तुला चांगल्या गुणांनी बारावीला पास व्हायचे आहे. मी त्या तयारीला लागलो पण ते कठीण होते तरीसुद्धा मी कसा बसा ६० टक्के गुण घेऊन पास झालो. पण त्यातही घरी कुणाचेच समाधान झाले नाही कारण ६० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डी.एड.ला नंबरच लागत नव्हते पण नशिबाने माझे शेवटच्या फेरीला डी.एड.ला नंबर लागला आणि आता घरचे सगळे जाम खुश झाले. आता आपला पोरगा मास्तर होणार आणि त्यांचे आनंद पाहून मी सुद्धा खूप खुश झालो आणि २००५ ला मी डी.एड ला प्रवेश घेतला आणि अध्ययन आणि अध्यापनाची काटकसर सुरू झाली. सुरुवातीला काहीच कळत नव्हते पण मग थोडं- थोडं समजायला लागले. समजण्याबरोबरच मित्र-मैत्रिणी झाल्या, अध्यापनाबरोबरच आता मजा यायला लागली आणि मस्त दिवस जाऊ लागले या दिवसात घरच्यांची स्वप्न विसरूनच गेलो हे कळलच नाही. आणि एकदम तोंडावर परीक्षा आल्यावर विचार करत बसलो की, आता कसे करायचे अभ्यास तर काही झालेला नाही आणि आता पेपर कसे द्यायचे तरीपण परीक्षा दिली आणि निकालाची वाट बघत बसलो निकाल लागला तेव्हा माझा निकाल नापास आला मी एकाही विषयात पास झालेलो नव्हतो सर्व विषयात मी नापास झालेला होतो आता घरी काय सांगायचे या विचाराने मी त्यावेळेला आत्महत्येचा विचार करू लागलो की, मी जीवनात काहीच करू शकत नाही घरच्यांना सांगितले आणि घरच्यांनी धीर देऊन मला घरी येण्यास सांगितले घरी येऊन खूप रडलो आणि पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला. परीक्षेची जोरात तयारी केली आणि शेवटी ७८ टक्के गुण घेऊन मी पास झालो. पण सरकारी नोकरी नाही म्हणून मी शेती व्यवसायात गुंतलो. शेतावर जाणे शेतातील कामे करणे इतक्यातच मी खुश राहू लागलो. शेतातून थोडा पैसा आला की थोडा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करून पाहायचे कधी यश मिळायचे तर कधी अपयश पण सगळे बरे चालले होते आणि मग घरच्यांचा विचार झाला की पोरगा सर्व गोष्टींनी बरोबर आहे तर लग्न करायला पाहिजे आणि माझे २०१९ ला लग्न झाले. लग्नानंतर एक वर्षांनी आम्हाला बाळ झाले सगळे खुश होते आणि लगेचच कोरोनाचे संकट देशावर आले. कोरोना काळात शेतातील उत्पन्न नाहीसा झाला आपल्याकडेच काही नाही तर मुलांच्या भविष्याचा काय होईल हे चिंता सतत लागली आपले आयुष्य तर गेले आणि आता आपल्या मुलांचे पण आयुष्य अंधारात दिसू लागले पण एसटी महामंडळाच्या संप काळात बस चालक म्हणून मला काम मिळाले व सगळ्यांना आनंद झाला की पोराला नोकरी मिळाली रे बाबा पण ते काम सुद्धा जास्त दिवस चालले नाही आणि सहा महिन्यातच आम्हाला कामावरून कमी करण्यात आले. पाहिलेली स्वप्न पूर्ण भंग झाली तेव्हाच विचार केला की आता पोलीस भरती कडे वळायचे त्याच काळात पोलीस भरती होणार अशी सूचना जाहीर झाली आणि त्यासाठी मी गडचिरोली येथे आलो. मी लक्ष्यवेध अकॅडमी समोर उभा राहत बघत बसलो आणि विचार करू लागलो आत जाऊ की नको पण मग हिंमत करून आत गेलो तेव्हा शारीरिक चाचणीचे प्रा. नंदनवार सर यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी मला लक्ष्यवेध अकॅडमी बद्दल तेथील नियम व अटी सांगितल्या ते मला पटले आणि मी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मग रोज नियमाप्रमाणे ग्राउंड ला जाऊ लागलो माझे वजन वाढलेला होता त्यामुळे मला धावता सुद्धा येत नव्हते पण सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ग्राउंड ला जाऊ लागलो आणि सराव सुरू केला हळूहळू स्वतःला बदलताना पाहिले यात मेहनत जरी माझी असली तरी जिद्द ही सरांची होती. धन्यवाद नंदनवार सर पण “डिसिप्लिन इज द बेस्ट हॅबिट ऑफ सक्सेस” या मंत्राचा सल्ला देणाऱ्या शिक्षकाची माझी भेट व्हायचीच होती ते म्हणजे माझ्या जीवनातील खरे हिरो द रियल मॅन हिरो राजीव सर माझे आयुष्य बदलणारे माझ्या जीवनाला नवी दिशा देणारे माझे महागुरू. सरांचा आणि माझे काही संबंध नव्हते ते एक मार्गदर्शक व मी एक विद्यार्थी एवढेच पण त्यांच्या स्वभाव गुणांनी मित्रत्वानी केव्हा मी त्यांच्या जवळ झालो मला कळलेच नाही. राजीव सर हे ज्ञानाचा महासागर आहेत म्हणून मी त्यांना कोहिनूर म्हणतो. राजीव सर म्हणजेच कोहिनूर असे विधान मी एकदा सर शिकवताना केलेले होते आणि ते सरांसाठी खरंच समर्पक आहे. राजीव सर व नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनामुळे मला एक नवी ओळख मिळाली म्हणून मी लक्ष्यवेध अकॅडमी चा तसेच लक्ष्यवेध अकॅडमी मधील सर्व प्राध्यापक वर्गाचा मी नेहमीच ऋणी आहे. मला मिळालेल्या यशात माझ्या आई वडिलांचा, माझ्या पत्नीचा माझ्या मुलांचा आणि माझ्या मित्रांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे तसेच ‘The’ गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे सर यांनी मला आपले मनोगत लिहिण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन सरांना धन्यवाद देतो.
– आशिष विनोद सहारे ( निवड पोलीस वाहन चालक)
मु.पोस्ट. चामोर्शी माल ता. आरमोरी जि.गडचिरोली