अबब… तलावाच्या पोटात शाळेचे बांधकाम

430

– गावकऱ्यांचा शाळा बांधकामाला विरोध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली ही मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : तलावामध्ये शाळा आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात घडला आहे. चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथे चक्क तलावाच्या पोटात शाळेचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर शाळा बांधकामाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर शाळा बांधकाम रद्द करून इतर ठिकाणी सुरक्षित जागेवर बांधकाम करावे अशी मागणी गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली,संवर्ग विकास अधिकारी पं.स. चामोर्शी, कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) जिल्हा परिषद गडचिरोली यांना देण्यात आले आहे.
चामोर्शी तालुक्यातील गटग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत येनापुर जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजुर झाले आहेत. ग्रामपंचायत सरपंच व सचिव यानी पाच महिन्यांपूर्वी मंजूर झाले आहे. येथील सरपंच निलकंठ निखाडे यांनी वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये असलेल्या तलावाच्या पोटात खोदकाम करून शाळा बांधकामास सुरुवात केली. दरम्यान गावकऱ्यांनी तलावाच्या पोटात शाळा इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबविले होते. परंतु परत त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्या बाजुला नव्याने ले ऑऊट देवून बांधकाम सुरू करण्यात आले आहेत. नवीन शाळा ईमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होउन तलावात पाणी राहत असल्यान मुलांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर जागा दलदलीची असल्याने इमारतीचे बांधकाम सुध्दा कोसळण्याची शक्यता आहे. तलावाखाली शेतकऱ्यांची शेती असुन शेतीतील धान पिकाचे उत्पन्न घेवुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहे. सदर इमारतीमुळे तलावाची पार फोडण्याची पाळी आल्यास शेतकऱ्यांची उपासमारीची पाळी येऊ शकते.
गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत असतांना व भविष्यात विद्यार्थ्यांचा जीवास धोका दिसून येत असूनही सरपंचांनी आपल्या मनमानी कारभाराने सदर बांधकाम सुरू केले आहे. यापूर्वी सुध्दा सरपंच व सचिव संगणमत करून ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक तक्रारी सुध्दा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करण्यात आलेले आहे. तरी आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही असा आरोपही पत्रकार परिषद मध्ये पालक आणि गावकऱ्यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, सदर ठिकाणी बळजबरीने बांधकाम केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवास धोका असून काही अपरिहार्य घटना झाल्यास याला ग्राम पंचायतचे सरपंच आणि सचिव तसेच तलावाच्या पोटात बांधकाम करण्यास मंजुरी देणारे प्रशासकिय अधिकारी हे जबाबदार राहतील, तलावाच्या पोटात होणारी नवीन शाळा इमारतीचे बांधकाम तात्काळ यांबविण्यात यावे व दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जागेवर बांधकाम करण्यात यावे मागणीही करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला सुरेश विठोबा गुंतीवार, राजू येगोलपवार, राहुल येगोलपवार, गमतीदास राऊत, आदित्य जाधव, हनुजी कन्नाके, शांताराम कुमरे, किशोर गोपवार, मोहन बंडावार तथा पालक व  गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here