The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, गडचिरोली येथील कार्यकारी लेखापाल रूपेश बारापात्रे (वय ४०) याला ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली, तक्रारदार हा आदिवासी समाजातील बेरोजगार युवक असून, त्याने मालवाहू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरीचा अर्ज केला होता. कर्ज मंजुरीसाठी ५० हजारांची लाच मागितली जात असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे तक्रार दिली. ACB पथकाने पडताळणी केल्यानंतर गडचिरोलीतील विधाते भवन, चामोर्शी रोड येथे सापळा रचला. बारापात्रे याने लाच स्वीकारताच ACB पथकाने त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अंतर्गत कलम ७, ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, नागपूरचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली ACB पथकाने केली.
गडचिरोलीतील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा एजंटने लाच मागितल्यास तत्काळ अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.
