अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई नक्कीच होईल : पोलीस अधीक्षक नीलोत्पल

155

– मुक्तिपथ व पोलीस विभाग आढावा बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक संपन्न ३ ऑक्टोबर रोजी झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर पोलीस उपविभागीय अधिकारी साहिल झरकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख उल्हास भुसारी, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, उपनिरीक्षक राहुल आव्हाड, व १२ हि तालुक्याचे मुक्तिपथचे तालुका संघटक बैठकीला उपस्थितीत होते.
सर्व तालुका संघटक व तालुक्यातील त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत तालुका निहाय माहिती जाणून घेत तालुक्यातील अवैध दारूबंदी स्थितीबाबत पोलीस अधीक्षकानी बारकाईने आढावा घेतला. पोलीस विभागाद्वारे कारवाई नक्कीच केल्या जाईल. मात्र गावसंघटनेच्या सदस्यांनी किंवा गावातील सक्रीय व्यक्तीने पंच किंवा साक्षीदार म्हणून पुढे आले पाहिजे. असे केल्यास केस मजबूत होऊन अवैध दारूविक्रेत्याला शिक्षा होणे संभव होऊ शकते. ज्या केस मध्ये मजबूत पंच व साक्षीदार होते अशा केस मध्ये विक्रेत्याला शिक्षा झाल्या आहे. करिता गावातील गावसंघटना व गावांनी अवैध दारू विरुद्ध उभे राहिले पाहिजे.
अवैध दारूबंदीसाठी निवेदेन सादर करतांना “आपले सरकार” या पोर्टलद्वारे निवेदन पाठवावे, जेणे करून त्यांची नोंद होऊन कारवाईच्या समाधानाबाबत किंवा स्थिती बाबत निवेदनकर्त्याला माहिती मिळते. या विविध बाबी त्यांनी चर्चा करतांना बैठकीत मांडल्या. मुक्तिपथच्या तालुका संघटकाना समजून सांगितल्या. गावातील अवैध दारूबाबत माहिती मिळून कारवाई करता यावी याबाबत पोलीस पाटलांचे प्रशिक्षण लवकरच करू असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात काही भागात गांजा विक्री व सेवनाचे प्रमाण आढळून आले. याचे शिकारी शाळकरी विद्यार्थी किंवा युवा पिढी होऊ नये या हेतूने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनाही या बैठकीत बोलावून जाणीवजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. अवैध दारू किती ठिकाणी बंद झाली याबाबत पुढील आढावा बैठक जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगतिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here