– कोट्यवधींच्या अपहारात दोषींवर निलंबन, गुन्हे, मालमत्ता जप्तीची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : जिल्ह्यातील धान्य खरेदी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अहेरी, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यांतील प्रकरणांमध्ये दोषींवर निलंबन, विभागीय चौकशी, वसुली आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई वेगाने सुरू झाली आहे.
अहेरीच्या शासकीय गोदामात 22.42 लाखांचा अपहार उघडकीस आल्याने गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले असून, सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरु आहे. सिरोंचाच्या 2011 च्या अपहार प्रकरणात 24.8 लाख रुपयांची वसुलीचे आदेश दिले गेले आहेत.
कुरखेड्यातील देऊळगाव येथील आदिवासी विकास संस्थेत 3900 क्विंटल तांदूळ गायब झाल्याचे समोर आले असून, तब्बल 1.53 कोटींच्या वसुलीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2011 मधील तांदूळ लोडिंग घोटाळ्यातील 2.67 कोटींपैकी 1.35 कोटी वसूल झाले असून उर्वरित 72 लाख वसुलीसाठी 13 राईस मिलर्सच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम राबवली जात आहे.
“अनियमितता करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असून, सर्व तालुक्यांतील गोदामांची 100% तपासणीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या धडक कारवाइमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, राईस मिलर्स आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड हालचाल सुरू झाली आहे.
