निर्भय व हिंसामुक्त निवडणूकीसाठी योगदान देण्याची संधी : निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर

148

– निवडणूक निरीक्षकांकडून यंत्रणेचा आढावा
– नवयुवकांचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढवा
The गडविश्व
गडचिरोली दि.२८ : लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेष असून या मतदार संघावर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आपले कार्य दाखविण्याची हीच संधी असून येथील निवडणूक निर्भय, हिंसामुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी पूर्ण योगदान देण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज केले.
निवडणूक निरीक्षक अनिमेष पराशर, निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणु गोपाल व कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज) आदित्य जीवने (अहेरी), किशोर घाडगे (चिमूर) संदीप भस्के (ब्रह्मपुरी) डॉ. रवींद्र होळी (आमगाव), अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड (देवरी), विवेक साळुंखे (कुरखेडा), सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक पराशर पुढे म्हणाले की ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक यंत्रणेने घरोघरी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क करून त्यांना मतदानासाठी आवाहन करावे. विशेषत: नवयुवकांचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
लांब चालत जाव्या लागणाऱ्या मतदान केंद्रावर सुदृढ व निरोगी मतदान अधिकारी नियुक्त करावे, सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, मतदान यंत्रांची हाताळणी करतांना त्याबाबत राजकीय प्रतिनिधींना अवगत करावे, मतदान व मतमोजणी प्रक्रीया तत्परतेने व्हावी यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे आदी सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात मतदान केंद्र किती आहेत, त्यातील किती संवेदनशील आहेत, मतदारांची संख्या, सर्व्हीस व्होटर, निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचारी, ८५ वर्षावरील तसेच दिव्यांग मतदार यांना टपाली मतपत्रीकेची सुविधा, मतदान यंत्रांची रसमिसळ प्रक्रिया, उपलब्ध मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षा यंत्रणा याबाबत निवडणूक निरीक्षकांनी माहिती जाणून घेत केलेल्या कार्यवाहीचा यंत्रणेकडून आढावा घेतला.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूकीशी संबंधीत माहिती दिली तर जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला सर्व निवडणूक नोडल अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here