– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
The गडविश्व
मुंबई, २१ ऑगस्ट : शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील चार अतिक्रमणे शासनस्तरावर नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विखे -पाटील यांनी सांगितले.
कातकरी समाजाकडून सुरू असलेल्या मागणीवर गेली अनेक वर्षे निर्णय होत नव्हता, अखेर मंत्री विखे-पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून याबाबत महत्वाचा आणि कातकरी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे कातकरी समाजाने स्वागत केले आहे.