दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षलीस अटक

1483

– विविध गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास ३१ मे रोजी अटक केली. सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा, (वय २३), रा. तोयामेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरिमिली हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा हा संशयितरित्या फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच २०२३ रोजी हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 13/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादवि, सह कलम 3,4 भास्फोका सहकलम 3/25, 5/27 भाहका सहकलम 135 मपोका सहकलम कलम 13, 16, 18 (अ), 20 युएपीए ॲक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात तो या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता असे दिसून आले.

दलममधील कार्यकाळ व गुन्ह्यात सहभाग

२०२० पासून जनमिलिशीया सदस्य म्हणून काम करीत होता. तेव्हापासूनच पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे ०७ असून, कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) येथील आगुळी वडदा नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२०-२१ मध्ये कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सोनपूर जि. नारायणपूर (छ.ग.) पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन माओवाद्यांना ठार करण्यात पोलीस जवानांना यश आले होते. २०२१मौजा दुरवडा जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन पोलीस जवान शहिद झाले होते. तसेच एक महिला माओवादी ही ठार करण्यात पोलीस दलास यश आले होते. २०२२ मध्ये मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२०-२१ मध्ये कोकामेटा जि. नारायणपूर (छ.ग.) गावातील छोटा पुलियावर झालेल्या ब्लास्टींगमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात ०४ पोलीस जवान शहिद झाले होेते. मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here