दीड लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षलीस अटक

1702

– विविध गुन्ह्रात सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : टीसीओसी कालावधीच्या दरम्यान कट्टर जहाल नक्षली शंकर वंगा कुडयाम(वय ३४) रा. कांडलापारती, पो. तह. भोपालपट्टनम, जि. बिजापुर (छ.ग.) यास सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­ऱ्या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान आज ३ मे रोजी अटक केली. त्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या शंकर वंगा कुडयाम या कट्टर जनमिलिशियास आज अटक केली.
शंकर वंगा कुडयाम हा २०१५ पासुन नॅशनल एरिया कमिटीमध्ये भरती होवुन आजपर्यत माओवादी चळवळीतील कामे करत होता. त्यावर २०२२ मध्ये मोरमेड-चिंतलपल्ली (छ.ग.) जंगल परिसर, २०२३ मध्ये बडा-काकलेर (छ.ग.) जंगल परिसर तसेच डम्मुर-बारेगुडा (छ.ग.) जंगल परिसर व २०२४ मध्ये लिंगमपल्ली-मोदुमडगु (म.रा.) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता. तसेच २०२४ मध्ये कोरंजेड व कचलेर येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. तसेच भोपालपट्टनम (छ.ग.) येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने शंकर वंगा कुडयाम याच्या अटकेवर दीड लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
१९ मार्च २०२४ ला उप-पोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मोदुमडगु जंगल परीसरात झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने उप-पोस्टे रेपनपल्ली येथे शंकर कुडयाम यास सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­ऱ्या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली.
अधिक तपासात असे दिसून आले की, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लावने अशी कामे तो करीत होता.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #naxalarrest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here