– मुक्तीपथ गाव संघटनाचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : धानोरा तालुक्यातील सीताटोला, जांभळी, घोटेविहिर व गडचिरोली तालुक्यातील राणभूमी, माळेमुल जंगल व शेत शिवारात गाव संघटनेच्या मदतीने सामूहिक अहिंसक कृती करून वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आलेला ९३ ड्रम मोह सडवा व १२० लिटर मोहफुलाची दारू नष्ट करण्यात आली.
धानोरा व गडचिरोली सीमावर्ती भागात विवीध गावांतील विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकून हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती संबंधित गावातील गाव संघटनांकडून प्राप्त झाली. माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या मदतीने मुक्तीपथ कार्यालय गडचिरली व धानोरा टीमने मिळून सामूहिक अहिंसक कृती केली. धानोरा तालुक्यातील सीताटोला, जांभळी, घोटेविहिर व गडचिरोली तालुक्यातील राणभूमी, माळेमुल जंगल व शेत शिवारात शोधमोहीम राबवली असता, ९३ ड्रम मोह सडवा व १२० लिटर मोहफुलाची दारू मिळुन आली. यावेळी दारू विक्रेत्यांनी पेटती दारू भट्टी सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. या कृतीमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. धानोरा व गडचिरोली तालुक्यातील सीमावर्ती भागात जंगलाचा आधार घेऊन दारू गाळली जाते. या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून परिसरातील विवीध गावांसह शहरातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जंगलपरिसरात लावलेल्या भट्ट्या वारंवार नष्ट करून विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्तीपथ गाव संघटनांकडून केली जात आहे.