जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

21

– चिमुकल्यांनी केली खरी कमाई
The गडविश्व
अहेरी, दि. १९ : नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या गडअहेरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कौशल्य विकास अभ्यासक्रमांची ओळख करून द्यावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळावा, शालेय स्तरापासूनच शिक्षण उद्योगाभिमुख करण्यात यावे आदी मुद्दांच्या अनुषंगाने शाळांमध्ये खरी कमाई, आनंद मेळावा आदी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्याची विक्री शाळास्तरावर केली जाते. गडअहेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खरी कमाई हा उपक्रम राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची जवळपास २५ दुकाने (स्टॉल) लावली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीचे अहेरी चे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र टिचकुले होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योत्स्ना मराठे ह्या होत्या तसेच विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख विनोद पुसालवार, गट साधन केंद्राचे जितेंद्र राहूड, भुरसे, माॅडेल शाळेचे मुख्याध्यापक रोहणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपस्थितांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला व सर्वांनी सर्व पदार्थांची प्रशंसा केली. यामुळे विद्यार्थ्यांना फारच आनंद मिळाला. खरी कमाई या उपक्रमांतर्गत विद्यार्थी हेच मालक व ग्राहक बनले होते. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रीतून 2 ते 3 हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योग, धंदा, दैनंदिन व्यवहार, खरेदी-विक्रीचा अंदाज यासह अन्य माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक संजय कोंकमुट्टीवार व सहशिक्षिका मंजुषा नैताम यांनी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्घाटक व प्रमुख अतिथी यांनी माता पालक व उपस्थितांना शिक्षणाचे महत्त्व घर घर संविधान याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here