-इलाका ग्रामसभेच्या निर्णयानुसार वाटचाल
The गडविश्व
गडचिरोली दि. १३ : धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कनगडी गावाने इलाखा ग्रामसभेच्या निर्णयानुसार आपल्या गावात अवैध दारूविक्रीसह घरगुती दारूवरही बंदी घातली आहे. या आदिवासीबहुल गावाने आपल्या गावाला दारूमुक्त करून इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून जवळपास ४८ किमी अंतरावर कनगडी हे गाव वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ३५० च्या घरात असून आदिवासी लोक वास्तव्याने असतात. पूर्वी गावातील काही लोक गावामध्ये दारूविक्री करीत होते. तसेच आदिवासी रितीरिवाजानुसार घरगुती दारूचा वापर सुद्धा केला जात होता. परंतु, या परंपरेमुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच ४० गावाच्या इलाखा ग्रामसभेने संपूर्ण गावातील प्रमुख गाव पाटील, भूमिया देहारी व ग्रामसभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत घरगुती दारूचा वापर या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ग्रामसभेने प्रत्येक गावातील परिस्थिती जाणून घेत दारू बंद करण्याचा ठराव मांडला. सोबतच निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री करणाऱ्या व्यक्ती कडून 20 हजारांचा दंड व दारूविक्रेत्यांची माहिती देणाऱ्याला 10 हजार रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव सर्वानुमते पारित करीत आपल्या गावातून दारूला हद्दपार करण्याचा प्रत्येक गावाच्या सदस्यांनी ठरविले. या ग्रामसभेत समाविष्ट कनगडी गावाने देखील या निर्णयाची अंमलबजावणी करीत आपल्या गावातून अवैध दारू विक्री बंद तर केलीच परंतु आदिवासी परंपरेत दारूचा वापर करण्याची परंपरा मोडीत काढली. यामुळे दारूचा वापर -पूर्णतः कमी झाला असून व्यसनाचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. गावात दारूविक्री होतच नसल्याने विनाकारण होणाऱ्या भांडण-तंट्यांचा प्रश्नच निर्माण होत नाही.
दुर्गम भागात वसलेल्या या आदिवासीबहुल गावाने दारूचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या गावातून अवैध दारूला हद्दपार करीत दारूबंदीचे समर्थन केले आहे. या गावातील महिला-पुरुषांनी एकत्र येत हे यशस्वी प्रयत्न केले आहे. आता गावातील महिला सुद्धा घरगुती दारूचा वापर बंद असल्याने होणारे फायदे इतरांपुढे मांडत आहेत. धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या या दारूविक्रीमुक्त गावाने आपल्या गावात शांतता व सुव्यवथा टिकवून ठेवत इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. संबंधित गावाने घरगुती दारूचे नुकसान जाणून हा निर्णय पारित केला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )