कोरेगाव परिसरात अस्वलांची दहशत

111

– मोहफूल वेचणी धोकादायक
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०१ : रांगीपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या, आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (रांगी) परिसरात अस्वलांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ ते पंधरा दिवसांत मोहफूल वेचणीच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी हल्ल्यांचा धोका

कोरेगाव परिसरात दरवर्षी मोहफूल हंगामात अस्वलांचे हल्ले होतात. वनविभागाकडून नागरिकांमध्ये सतर्कतेसाठी जागृती केली जात असली, तरी मोहफूल वेचणी पहाटेच्या वेळेत सुरू होत असल्याने अनेकजण अंधारातच जंगलात प्रवेश करतात. त्यामुळे अस्वलांसह वाघ आणि बिबट्यांचा धोका अधिक वाढतो. वनविभागाने नागरिकांसाठी अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

बछड्यांसह वाघिणीचा वावर

मरेगाव उपक्षेत्रात बछड्यांसह वाघिणीचे दर्शन अनेकांना यापूर्वी झाले आहे. सध्या कोणतीही अनुचित घटना घडली नसली, तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. रांगी, मौशीखांब, वडधा, नरोटी आणि बंजाळी या गावांना लागून असलेल्या जंगल परिसरात मागील दोन महिन्यांपासून रानटी हत्तींचाही वावर होता. सध्या हे हत्ती पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात असल्याचे सांगितले जात आहे.

वनविभागाकडून ठोस उपाययोजनांची मागणी

कोरेगाव परिसरात अस्वल आणि वाघाच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here