सावधान ; २१ जून ला चिचडोह बॅरेजच्या सर्व दरवाज्यातून पाणी सोडणार

1116

– गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली,दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजचे शुक्रवार २१ जून रोजी सकाळी ८ वाजता सर्व ३८ दरवाजातून १९०.२३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणातून ४० घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने २९ जून २०२४ पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा १७९.८०० मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस ५ किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी ६९१ मीटर असून त्यावर १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये १८ जून २०२४ रोजी पाणी पातळी १७८.९० मी. व पाणीसाठा ११.२८५ द.ल.घ.मी. इतका आहे.

या गावांना धोका :

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ.

वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chichdoh #chamorshi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here