भामरागड : गरोदर महिलेप्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल

230

– आरोग्यसेवा आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या अधिकारांचे उल्लंघन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नुकतेच २२ वर्षीय जेवारी संदीप मडावी या आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना नाला ओलांडता न आल्याने जेसीबीच्या बकेट मध्ये बसवून नाला ओलांडण्यास भाग पडल्याची अत्यंत अमानवी घटना घडली आहे. राज्यभरातून या घटनेविरुद्ध रोष निर्माण केला जात असून जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे कुडकेली या राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरता बनवलेला पूल पाण्याने वाहून गेला. पावसाळ्यात या भागात उद्भवणाऱ्या परिस्थितीची पूर्व माहीती असतांना देखील तत्परतेने रस्ता व पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. याचा परिणाम सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. सदर घटनेमुळे गरोदर महिलेच्या आरोग्यसेवा व सन्मानपूर्वक जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष राज बन्सोड यांनी थेट राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार, प्रत्येक नागरिकाला मुबलक आरोग्य व वैद्यकीय सेवांचा व योग्य रस्त्यांचा मूलभूत अधिकार आहे. सदर घटनेत महिलेच्या या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे तक्रारीत अधोरेखित करण्यात आले.

या आहेत तक्रारीतील मागण्या?

– पीडित जेवारी संदीप मडावी यांना सहन कराव्या लागणाऱ्या नाहक त्रासासाठी योग्य आर्थिक भरपाई द्यावी.
– भामरागड भागात विशेषत: पावसाळ्याच्या हंगामात त्वरित आणि पुरेशा आरोग्यसेवा सुविधा पुरवण्याचे निर्देश द्यावेत.
– संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि रस्ते बांधकामातील विलंबामुळे अशा गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी आवश्यक कारवाई करावी.
– अशा घटना भविष्यकाळात टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेत आणि सुधारणा कराव्यात.

प्रत्येक वर्षी भामरागड सारख्या दुर्गम भागात पावसाळ्यात सहा महिण्यापेक्षा अधिक काळ रस्त्यांच्या तुटणाऱ्या संपर्कामुळे आदिवासी समाजाला अनेक समस्याचा सामना करावा लागतो. सदर घटनेतून या प्रश्नांची दाहकता परत एकदा पुढे आली आहे. पावसामुळे होणाऱ्या या गंभीर समस्या माहिती असून देखील योग्य पर्यायी मार्ग तयार न करता रस्त्याचे काम सुरु करण्यात आले ही प्रशासनाची मोठी चूक आहे, ज्यामुळे नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे असे राज बन्सोड यांनी सांगितले. संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत राहून जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे निरंतर काम करत राहू असे देखील त्यांनी सांगितले.

(#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here