बिरसा मुंडा हे एक महान क्रांतिकारक : रोहिदास राऊत

227

– रांगी येथे बिरसा मुंडा जयंती आणि गोंडी धर्म संमेलन संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : बिरसा मुंडा हे एक महान क्रांतिकारक आणि देशभक्त होते ज्यांनी देशासाठी लढा दिला आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. आदिवासी समाजातील इतर अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिले. या क्रांतिकारकांचा इतिहास आणि कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी व्यक्त केले.
धानोरा तालुक्यातील रांगी गावात साजऱ्या झालेल्या क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
गोंडवाना गोटूल बहुउद्देशिय संस्था आणि गोंडवाना गोंड महासभा यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते चरणदास पेंदाम होते तर आदिवासी नेते संदीप वरखडे, आदिवासी कर्मचारी महासंघाचे माधव गावड, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रशांत मडावी, रिपब्लिकन पक्षाचे कुलपती मेश्राम, रांगीच्या सरपंचा फालेश्वरी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते ममता हिचामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गावड म्हणाले, आदिवासी युवकांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात मोठी पदे मिळवावीत आणि त्याद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. बिरसा मुंडा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा युवकांना भविष्यात उपयोगी पडेल. प्रशांत मडावी म्हणाले की, आदिवासींच्या परंपरा आणि संस्कृतीला खूप महत्त्व असून ती जपली पाहिजे. आदिवासींच्या खऱ्या इतिहासाबाबत आदिवासींमध्ये अधिक जागृती होण्याची गरज असून समाजाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित तरुणांनी हे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पेंदाम म्हणाले की, बिरसा मुंडा यांचे कार्य संपूर्ण देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील आणि त्यांचे समर्पण वर्षानुवर्षे स्मरणात राहील.
प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बिरसा चौकातून गावात एक विशाल ‘कोया पुणम’रॅली काढण्यात आली जी मुख्य रस्त्यांवरून फिरली. आणि सार्वजनिक मैदानावर जाहीर सभा झाली. कार्यक्रमाची सुरूवात म्हणून आदिवासी नेते प्रशांत मडावी आणि भूषणकुमार काटेंगे यांच्या हस्ते गोंडी धर्म ध्वजारोहण करण्यात आले. पारंपारिक आदिवासी नृत्येही सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र काटेंगे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन घनश्याम मडावी व सदाराम हलामी यांनी केले व किशोर कुळमेथे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आदिवासी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here