निवृत्त शिक्षक भरतीचा बहिष्कार करा

165

– शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामसभांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जनविरोधी भाजप सरकारने सुशिक्षीत बेरोजगारांची घोर चेस्टा चालविलेली आहे. अनुसूचित क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदभरती न करता निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे हजारो बेरोजगार युवकांची नोकरीची संधी हिरावली जात असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात येणार आहे. त्यामुळे शासन नियुक्त करत असलेल्या निवृत्त शिक्षकांना आपल्या गावातील शाळेत रुजू करुन घेवून नये व रुजू झाल्यास त्यांचे मानधन शासनाने अदा करु नये असे ठराव ग्रामसभेत पारीत करुन निवृत्त शिक्षकांच्या तात्पूरत्या पदभरतीला सर्व ग्रामसभांनी तीव्र विरोध करावा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले आहे.
ग्रामसभांना केलेल्या आवाहनात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, अनुसूचित क्षेत्रातील युवक शिक्षक होण्यासाठी शिक्षण घेवूनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगार होवून गावात आहेत. गावांमधील रिक्त पदे भरली गेली तर हजारो युवकांना कायमस्वरुपी नोकरी मिळणार आहे. मात्र येणाऱ्या निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना राबवणारे सरकार हक्काच्या नोकऱ्या लाडक्या पेंशन धारकांना देवून बेरोजगार युवकांची थट्टा करत आहे.
येणाऱ्या काळात अशाच पध्दतीने इतरही पदांवर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन हे सरकार अनुसूचित क्षेत्रातील कायदेभंग करुन ग्रामसभांच्या सुशिक्षीत तरुणांना देशोधडीला लावणार आहे. त्यामुळे या निवृत्त भरतीचा ग्रामसभांनी ठराव घेवून तीव्र विरोध करावा व त्यानंतरही सदर निवृत्त शिक्षक आपल्या गावातील शाळांमध्ये रुजू झाले तर सुशिक्षीत बेरोजगार तरुण व शाळा व्यवस्थापन समित्यांनी बेमुदत शाळा बंद आंदोलन करावे असेही आवाहन भाई रामदास जराते यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #shekap #gadchirolilocalnews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here